भरत मल्लाव
भिगवण: उजनी धरणाच्या काठी इतर जातींच्या पक्ष्यांची मांदियाळी असली तरी प्रमुख आकर्षण असलेल्या व हजारो मैलांचा प्रवास करून येणाऱ्या अग्निपंखी अर्थात फ्लेमिंगोंनी यंदा मात्र पाठ फिरवली आहे. हजारोंच्या संख्येने येणारे रोहित केवळ शंभर-दीडशेच्या संख्येने उजनीत दाखल आहेत.
उजनी धरणाच्या गेली 40 वर्षांच्या इतिहासात पाहिल्यांदाच उजनीकडे झेपावण्याची अग्निपंखांची वाट चुकली आहे. उजनीचे प्रदूषण, पर्यटनाच्या नावाखालील मानवी हस्तक्षेप, वातावरणातील बदल, खाद्याची कामरतात यासह अन्य कारणांनी या परदेशी पाहुण्यांनी उजनीची वाट वाकडी केल्याने भविष्यातील पर्यावरणाच्या मोठ्या ऱ्हासाचे संकेत मिळत आहेत. साधारण दरवर्षी फेबुवारी महिन्यात उजनी पाणलोट क्षेत्रात फ्लेमिंगोसह इतर जातींच्या पक्ष्यांचे आगमन निश्चित मानले जाते.
जसजशी पाण्याची पातळी कमी होत जाते तसतसे मार्च व एप्रिल महिन्यात या सर्व पक्ष्यांची मांदियाळी पाहावयास मिळते. त्यांच्या कवायती, किलबिलाट अवघ्या उजनीच्या वैभवात भर टाकते. या परिसराचे सौंदर्य खुलावणारा हा क्षण ठरत असतो. पक्ष्यांच्या या सौंदर्याने येणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे देखील पारणे फिटते. त्यातच उजनीतील माश्यांची चव देखील चाखण्यास मिळत असते. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक व अभ्यासकांचा ओढा उजनीकडे वाढतो. या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे उजनीची ओळख देशाच्या नकाशावर जाऊन पोहोचली आहे. उजनीकाठ देश-विदेशांतील पक्ष्यांनी बहरून जात असल्याने येथे गेल्या दहा बारा वर्षांत पर्यटकांची पावले वळू लागली. मात्र, पर्यटकांना खूश करण्यासाठी काहींनी पक्ष्यांच्या थव्यावरच घाव घालण्यास सुरुवात केली.
वास्तविक पक्ष्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी त्यांच्या भोवती इंजिन होड्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज, फटाके फोडून त्यांना उडण्यास प्रवृत्त करणे, कृत्रिम खाद्य टाकणे, गोंगाट करणे, पक्ष्यांच्या जवळ जाणे असे सर्रास प्रकार घडू लागले. याचाही परिणाम झाल्याची शंका व्यक्त होत आहे. दुसऱ्या बाजूने उजनीच्या प्रदूषणात कमालीची वाढ होऊन नैसर्गिक खाद्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचाही देखील विपरीत परिणाम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी मोठ्या संख्येने येणारे रोहित पक्षी अचानक गायब कसे झाले? त्यांचा मार्ग बिकट का बनला की संभाव्य पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या धोक्याची घंटा मानावा, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. यंदा उजनीच्या पाण्यात उशिरा घट झाल्याचा व अतिरिक्त पावसाचा हा परिणाम असल्याचे मत पर्यटन व्यासायिक उमेश सल्ले यांनी व्यक्त केले. याबाबत प्रसिद्ध व जेष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांच्याशी संपर्क साधला पान 2 वर
वेळीच धोके ओळखा...
याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे म्हणाले की, उजनीचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. परिणामी आवश्यक वनस्पतीची निर्मिती होण्यास मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक वनस्पतींच्या प्रजाती नामशेष झाल्या आहेत. इतर पक्षांना लागणारे लहान माश्यांचे खाद्य देखील चुकीच्या मासेमारीमुळे नष्ट झाले आहेत. यातून नैसर्गिक साखळीच धोक्यात आली आहे. याचा धोका वेळीच ओळखण्याची व त्यावर उपाययोजना आखण्याची गरज आहे.