Fishermen Pudhari
पुणे

Ujani Dam Fishing Contract: उजनीतील मासेमारीचा ठेका रद्द करा; ४५ गावांतील मच्छीमारांचा एल्गार

भूमिहीन धरणग्रस्त मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर; ग्रामपंचायतींसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, तीव्र आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पळसदेव: उजनीतील मासेमारीवर पोट भरणाऱ्या भूमिहीन धरणग्रस्त मच्छीमारांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा प्रयत्न होताच, सोमवारी (दि. ७) पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील उजनी धरणाकाठच्या ४५ गावातील ग्रामपंचायती समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उजनी मच्छीमार बचाव अभियानाने हे आंदोलन पुकारले होते.

कृष्णा खोरे महामंडळाने उजनी जलाशयातील मच्छीमारीबाबत गेल्या महिन्यात ई-टेंडर प्रक्रिया सुरू केली. उजनी धरणातील प्रस्तावित मासेमारी ठेकेदाराच्या विरोधात स्थानिक मच्छीमार व भूमिपुत्र एकवटले आहेत. उजनी धरणावर मच्छीमारांची अनेक कुटुंब पिढ्यान् पिढ्या मासेमारी व्यवसाय करीत आहे. यातून अनेकांना रोजगार मिळतो. मात्र, शासनाच्या ठेकेदारी पद्धतीने हा रोजगार हिरावला जाण्याची शक्यता असल्याने मच्छीमार वर्गात तीव्र संतापाचे वातावरण आहे. याविरोधात सातत्याने मच्छीमार आंदोलने करीत आहेत. मासेमारी व्यवसाय ठेकेदाराच्या घशात घालून मच्छीमारांना देशोधडीला लावायचे हे धोरण आहे. मच्छीमारांवर पडलेला हा सरकारी दरोडा आहे, असा घणाघात आंदोलकांनी केला.

उजनीतून मच्छीमारीचा ठेका देण्याच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील पळसदेव, डाळज, चांडगाव, अगोती, कुंभारगाव, भिगवण, खानोटा यासह चाळीसहून अधिक गावात सोमवारी (दि. ७) सकाळपासूनच मच्छीमार ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाने आमची मागणी न ऐकल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला.

उजनीच्या ४० गावांतील आंदोलन चंद्रकांत भोई, अनिल नगरे, उज्ज्वला परदेशी, विक्रम शेलार, बाळासाहेब काळे, दत्तात्रय व्यवहारे, संजय दरदरे, शरद गलांडे, हरिभाऊ जाधव, सदगुरू शिंदे, अंगद गायकवड, अमोल पतुरे, नाना दरदरे, उत्तम दरदरे, बाळासाहेब गाडेकर, चिंतामण तिकोने, पिंटू शिंदे, युवराज नगरे आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

पारधी समाजातील महिला आक्रमक

डिकसळ, मलठण, राजेगाव, कुंभारगाव येथे पारधी समाजातील महिलांना आक्रमक पवित्रा घेतला होता. मुलांना घेऊन त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या."आम्ही गुन्हेगारी सोडली, सुधारलो, उजनीत घाम गाळून पोरं पोसली. सरकारला आमचं हे प्रामाणिक जगणं बघवत नसेल तर आम्ही पुन्हा तेच करू. चोऱ्या, दरोडे, लुटमार सुरू करू. कायदा-सुव्यवस्था बिघडली तर त्याला सरकार जबाबदार असेल," असा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT