Maza Bappa 2026: विद्यार्थ्यांच्या हातून साकारला बाप्पा; ‘माझा बाप्पा २०२६’तून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

डी. ई. एस. सेकंडरी स्कूलमध्ये शाडू मातीपासून मूर्तीनिर्मिती कार्यशाळा; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाला वाव
Maza Bappa 2026
Maza Bappa 2026Pudhari
Published on
Updated on

पुणे: त्रिशाने आपल्या मनात कल्पिलेल्या बाप्पाची मूर्ती साकारली, तर साईश्रीने फेटा घातलेल्या श्रीगणरायाची मूर्ती घडवली. अथर्वने एक नव्हे, तर तब्बल तीन गणेशमूर्ती साकारल्या, तर अनुजने मातीला आकार देत लाडक्या बाप्पाचे सुंदर रूप घडवले. आपल्या हाताने घडवलेली मूर्ती पूर्ण होताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि याच पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची घरी प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही देण्यात आला. निमित्त होते ‘माझा बाप्पा २०२६’ या उपक्रमांतर्गत टिळक रस्त्यावरील डी. ई. एस. सेकंडरी स्कूलमध्ये आयोजित केलेल्या शाडू मातीपासून श्रीगणेशमूर्ती साकारण्याच्या कार्यशाळेचे.

Maza Bappa 2026
Junnar Extortion Case: कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी देत ४ लाखांची खंडणी?; जुन्नरमध्ये दोन नगरसेवकांसह दोघांविरोधात गुन्हा

पुढारी माध्यम समूह, पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ‘माझा बाप्पा २०२६’ या उपक्रमांतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून श्रीगणेश मूर्तीनिर्मिती कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (दि. ७) डी. ई. एस. सेकंडरी स्कूलमध्ये झालेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पनेतील गणरायाला प्रत्यक्ष आकार दिला. या वेळी डी. ई. एस. सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका विजया जोशी उपस्थित होत्या. सॉलिटर ग्रुप, गोयल गंगा ग्रुप, बढेकर ग्रुप, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ पुणे, ऑटोट्रॉनिक्स इंजिनिअरिंग प्रा. लि. आणि केले ग्रुप हे या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत. शहरातील विविध शाळांमध्ये गुरुवारपर्यंत (दि. १०) शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

Maza Bappa 2026
Ganadhish Navonmesh Competition: पुण्यात गणरायाच्या स्वागतासाठी ‘गणाधीश नवोन्मेष स्पर्धे’चा जल्लोष; मंडळांना मिळणार ३१ हजारांचे पहिले पारितोषिक!

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सच्या शिल्पकला विभागाचे प्रमुख सुनील देशपांडे, प्रा. ओंकार पवार तसेच एकनाथ हलगुंडे, श्रीरंग घोलप, तेजस राठोड, जिज्ञासा कुंभार, कीर्ती मुळे, प्रज्वल अंगवणे, सोहम डोके या विद्यार्थ्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना मूर्तीनिर्मितीचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी शाडू मातीतून श्रीगणेशमूर्ती साकारल्या. कार्यशाळेत केवळ मूर्तीनिर्मितीचे प्रशिक्षण दिले नाही, तर त्यामागील पर्यावरणपूरक विचारही विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याची गरज, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Maza Bappa 2026
Pune Ganeshotsav Puja Samagri: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; पुण्यात पूजासाहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

स्वतःच्या हाताने साकारलेल्या शाडू मातीच्या मूर्तीची घरी प्राणप्रतिष्ठा करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही पालकांना करण्यात आले. मातीला आकार देताना विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. प्रत्येक विद्यार्थी आपल्या कल्पनेनुसार मूर्ती साकारत होता. त्यामुळे कार्यशाळेला सर्जनशीलतेची आणि उत्साहाची जोड मिळाली. कार्यशाळेत सहभागी झालेल्या साईश्री गवळी आणि त्रिशा गांधी म्हणाल्या, ‘मित्र-मैत्रिणींसोबत शाडू मातीपासून बाप्पा घडवताना खूप मजा आली. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पर्यावरणाचे संवर्धन किती महत्त्वाचे आहे, हे कळले.’’

Maza Bappa 2026
IUCAA MeerKAT Survey: आयुकाच्या ‘मीरकॅट’ प्रकल्पाच्या १.५ पेटाबाइट डेटाला जर्मनीची साथ; जगभरातील संशोधकांना होणार फायदा

पुढारी माध्यम समूहाच्या वतीने शाळेत विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीपासून श्रीगणेश मूर्तीनिर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव मिळाला. त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. विद्यार्थ्यांना केवळ गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देणे, हा या कार्यशाळेचा उद्देश नव्हता, तर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आला. मूर्ती बनविताना विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम आणि एखाद्या गोष्टीवर दीड ते दोन तास लक्ष केंद्रित करण्याची सवय निर्माण झाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सकारात्मक आकार मिळतो. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

विजया जोशी, मुख्याध्यापिका, डी. ई. एस. सेकंडरी स्कूल (टिळक रस्ता)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news