पुणे: नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएकडून यूजीसी-नेट डिसेंबर 2025 परीक्षेची ई-प्रमाणपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना ही प्रमाणपत्रे अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन डाऊनलोड करता येतील. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी किंवा ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे.
यूजीसी नेट डिसेंबर 2025 परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 यादरम्यान विविध केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेचा निकाल 4 फेबुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर आता ई-प्रमाणपत्रे जारी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एनटीएने यासंदर्भात सार्वजनिक सूचना जारी करून उमेदवारांना अधिकृत पोर्टलवरून प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे.
ई-प्रमाणपत्रात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, अर्ज क्रमांक, विषय, श्रेणी, एकूण गुण, टक्केवारी आणि पात्रता स्थिती, यांचा समावेश असेल. प्रमाणपत्रावर फोटो आणि क्यूआर कोड असणे अनिवार्य आहे. जर एखाद्या उमेदवाराच्या प्रमाणपत्रात फोटो किंवा क्यूआर कोड नसेल तर ते अवैध मानले जाईल आणि त्याने पुन्हा डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित प्रमाणपत्र हे उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
यामुळे हजारो उमेदवारांना सहाय्यक प्राध्यापकपदासाठी अर्ज करण्याची संधी मिळेल. जर एखाद्या उमेदवाराला प्रमाणपत्र डाऊनलोड करताना अडचण येत असेल तर एनटीएच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाइट नियमित तपासावी. एनटीएने उमेदवारांना प्रमाणपत्र ताबडतोब डाऊनलोड करण्याचे आवाहन केले आहे.
...असे करा ई-प्रमाणपत्र डाऊनलोड
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट र्ीसलपशीं.पींर.रल.ळप किंवा र्ीसलपशीं. पींर. पळल. ळप वर जावे. होमपेजवर डाऊनलोड सर्टिफिकेट लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर रोल नंबर, जन्मतारीख, अर्ज क्रमांक यांसह आवश्यक क्रेडेंशियल्स टाकून सिक्युरिटी कोड टाकून सबमिट बटन दाबल्यानंतर प्रमाणपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.