बारामती : पुढारी वृत्तसेवा
सरत्या वर्षाला निरोप देत असताना शहरातील सिनेमा रस्त्यावरील एका दुकानात चोरी झाली. शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेत अटक केली. आरती शंकर पाथरकर (वय २६) व ताई शंकर पाथरकर (वय २०, रा. आमराई, बारामती) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले की, शहरातील सिनेमा रस्त्यावरील गांधी ऑटोमोबाईल्स हे दुकान चाेरट्यांनी पहाटे फाेडले हाेते. दहा हजार रुपयांच्या रोख रकमेसह २५ हजार रुपयांचे पितळी गन मेटल बुशींग, पाच हजार रुपयांच्या लोखंडी बेअरिंग असा माल चोरून नेला होता. याबाबत समर शांतीकुमार गांधी (रा. विजयनगर काॅलनी, बारामती) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. मुख्य रस्त्यावरील दुकानात चोरी झाल्याने व्यापाऱयांमध्ये तीव्र असंतोष होता.
व्यापारी असोसिएशनने यासंबंधी महाडीक यांची भेट घेत चोरीचा छडा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश पाटील, सागर घोडके, हवालदार रामचंद्र शिंदे, दशरथ कोळेकर, दशरथ इंगोले, गौरव ठोंबरे, सचिन कोकणे, महिला पोलिस गवळी यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली. त्यात दोन महिलांनी ही चोरी केल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना ओळखत ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचलं का?