

चंदीगढ ; पुढारी ऑनलाईन : हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील तोशाम भागात मोठे भुस्खलन झाले. दादम येथे खनन काम सुरू आहे. या कामावर असणाऱ्या जवळजवळ १२ ते १५ वाहने याखाली अडकली असल्याचे स्थानिकांनी म्हटलं आहे. (Haryana landslide) आतापर्यंत चार लोकांना जीव गमवावा लागला आहे. १५ च्यावर लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनास्थळावर असलेल्या अधिकारी म्हणाले की, बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. तोशाम ब्लॉकच्या दादम खाण परिसरात डोंगराचा मोठा भाग फुटल्याने भूस्खलन झाल्याचे ते म्हणाले.
मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री जेपी दलाल घटनास्थळी पोहोचले. भूसस्खलन होण्याचे कारण समजू शकलेले नाही. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने या भागातील खाणकामावरील बंदी उठवल्यानंतर दादम खाण परिसरात आणि टेकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू आहे. भूस्खलन झाले तेव्हा कामगार वाहनातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात हाेते. चिखलामुळे त्यांची वाहने त्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत किमान चार जण ठार झाले आहेत. अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बेपत्ता लोकांचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.
हरियाणाचे मंत्री अनिल विज म्हणाले की, भिवानी जिल्ह्यातील खाण काम सुरू असलेल्या परिसरात घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. गाझियाबाद येथून 'एनडीआरएफ'च्या मधुबन येथून एसडीआरएफ टीमला पाचारण करण्यात आले आहे. हिस्सारहून लष्कराची तुकडी मागवण्यात आली आहे. आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचलं का?