ठाणे : पन्नास रुपये चोरल्याने निर्दयी बापाने घेतला मुलाचा जीव; हत्यारा बाप गजाआड - पुढारी

ठाणे : पन्नास रुपये चोरल्याने निर्दयी बापाने घेतला मुलाचा जीव; हत्यारा बाप गजाआड

ठाणे : पुढारी वृत्तसेवा

घरातून पन्नास रुपये चोरून नेले या कारणावरून दहा वर्षीय मुलास जबर मारहाण करून त्याचा जीव घेणाऱ्या निर्दयी बापाला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संदीप उर्फ बबलू ओमप्रकाश प्रजापती असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

कळवा वाघोबानगर, ठाकुरपाडा झोपडपट्टी येथे आरोपी संदीप ओमप्रकाश प्रजापती हा दोन मुले व पत्नी यांच्या समवेत राहतो. २९ डिसेंबर रोजी दुपारी त्याचा दहा वर्षीय मुलगा करण याने घरातून पन्नास रुपये चोरले होते. यावरुन संदीप उर्फ बबलू याने मुलास जबर मारहाण केली. या मारहाणीत मुलगा बेशुद्ध पडला, त्यानंतर निर्दयी बापाने त्याला घरातच चादरीत गुंडाळून ठेवले. त्यास घरात कोंडून दरवाजा बंद ठेवला. परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी कळवा पोलिसांना दिली.

पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहणी केली. घरात दहा वर्षीय मुलास एका चादरीत गुंडाळून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्वरित त्यास कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मुलाच्या अंगावर जबर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या. त्याची डोक्याची कवटीदेखील फुटली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

यावेळी पोलिसांनी मयत मुलाच्या बहिणीची विचारपूस केली असता भाऊ करण याने घरातून पन्नास रुपये चोरले होते, त्यावरून पप्पानी त्यास मारहाण करून मारून केली, असे तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच हत्या करणाऱ्या निर्दयी बापास कळवा परिसरातून अटक केली. तपास पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर करीत आहेत. पाच दिवसांपुर्वी कळव्यात प्लास्टिक ड्रममध्ये बुडवून पाच महिन्याच्या चिमुकल्याची हत्या तिच्याच जन्मदात्या आईने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर जन्मदात्या पित्याने आपल्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आल्याने कळवा परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button