पुणेः सदाशिवपेठ, नवीन शिवणे कोथरुड परिसरात चोरट्यांनी सदनिका आणि प्रिटींगप्रेसच्या दुकानात चोरी करून चोरट्यांनी तीन लाख 38 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी, पर्वती आणि अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदाशिव पेठेतील एका सदनिकेतून चोरट्यांनी रोकड,चांदीची नानी, तांब्याची पातेली असा 38 हजार रुपयांचा ऐव चोरी केला. याप्रकरणी, 73 वर्षीय जेष्ठाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पर्वती पोलिसांनी चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादींची सदाशिव पेठेतील विजयनगर कॉलनीत सदनिका आहे. दरम्यानच्या काळात त्यांची सदनिका बंद असताना, चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरी केली आहे.
तर दुसरी चोरीची घटना वनदेवी चौक नवीन शिवणे कोथरुड येथील ड्रीम कॅचर या फ्लेक्स प्रिंटगच्या दुकानात घडली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून प्रिटींग प्रेस मशीनचे झाकन खोलून तीन लाख रुपये किंमतीचे प्रिटींग हेड चोरी केले आहेत.
याप्रकरणी, कर्वेनगर येथील 35 वर्षीय दुकान मालकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 21 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान फिर्यादींचे दुकान बंद असताना चोरट्यांनी ही चोरी केली आहे.