नारोळीत आजपासून तुकाईदेवी यात्रा सुरू; पौर्णिमेच्या दिवशी भक्तांची मांदियाळी Pudhari
पुणे

Tukaidevi Yatra Naroli: नारोळीत आजपासून तुकाईदेवी यात्रा सुरू; पौर्णिमेच्या दिवशी भक्तांची मांदियाळी

दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात; रात्री छबिना आणि लोकनाट्याचा कार्यक्रम रंगणार

पुढारी वृत्तसेवा

सुपे : बारामती तालुक्यातील नारोळी येथील ग्रामदैवत असलेल्या तुकाई देवीच्या यात्रेला सोमवार (दि. 6) पासून सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान ग्रामस्थांच्यावतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.(Latest Pune News)

दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला येथील देवीची यात्रा असते. या देवीला तुळजापूरची प्रति देवी समजली जाते. दसऱ्याला संध्याकाळी देवीला झोपवून पौर्णिमेलाच उठविले जाते. यादरम्यान मंदिराचा आतील गाभारा पौर्णिमेपर्यंत बंद ठेवला जातो.

पहिल्या दिवशी प्रथम देवीला अभिषेक घालून साडी-चोळी नेसवली जाते. येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत सकाळी 8 वाजता आरतीचा कार्यक्रम करण्यात येतो, तसेच दिवसभर भाविकांच्या माध्यमातून मानाचे व नवसाचे दंडवत घातले जातात. ग्रामस्थांच्या माध्यमातून रात्री 8 वाजता देवीचा छबिना काढण्यात येतो. रात्री 12 वाजता देवीची महाआरती केली जाते. या वेळी येथे भाविक, पै-पाहुणे एकत्र येतात.

त्यानंतर रात्री मालती इनामदार यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. 7) सकाळी लोकनाट्याची हजेरी होऊन यात्रेची सांगता होणार असल्याची माहिती यात्रा कमेटीच्या वतीने देण्यात आली. येथील देवीच्या उत्सवास घटस्थापनेपासून सुरुवात होते.

येथील देवीच्या तिसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि नवव्या माळेला विशेष महत्व असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यात्रा काळात मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT