पुणे

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी : विश्वस्तांचा जमिनींवर डोळा!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारत देश स्वयंशिस्त, सुशिक्षित आणि समृद्ध व्हावा, यासाठी आयुष्य बहाल करणार्‍या भारत सेवक यांच्या उपजीविकेची, प्रशिक्षणाची आणि निवासाची व्यवस्था करणार्‍या 'सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी'त विश्वस्त मर्जीचा खेळ सुरू आहे. सोसायटीवर सचिव म्हणून ताबा दाखविणार्‍या मिलिंद देशमुख यांनी संस्थेच्या जमिनी कवडीमोल दरात विकून अनियमितता केल्याचे प्रकरण पोलिस, धर्मादाय आयुक्त आणि उच्च न्यायालयापर्यंत गेले आहे. असे असले तरी आजही देशमुख हे कागदोपत्री 'खेळ' करीत चोरून कोट्यवधी रुपयांच्या जमिनी विकण्यात गुंग आहेत.

संबंधित बातम्या :

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे गुरू नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी समृद्ध भारत आणि आध्यात्मिक राजकारण, यासाठी 'सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी'ची स्वातंत्र्यापूर्वी स्थापना केली. या संस्थेचे सामाजिक कार्य पाहता, अनेक जमीनदारांनी तिला जमिनी दान दिल्या होत्या. त्या जमिनी आज मुख्य बाजारपेठेत आल्याने त्या जमिनींचे मूल्य आता कोट्यवधी रुपये आहे. याच गोष्टीचा फायदा घेत देशमुख यांच्यासह काही विश्वस्तांनी परस्पर जमिनी विकून कोट्यवधींचा 'खेळ' करण्यात यश मिळविले आहे.

उत्तर प्रदेशची जमीन…
उत्तर प्रदेश येथे विद्यार्थ्यांसाठी निवासव्यवस्था व्हावी म्हणून पेचपेडवा, नगर पंचायत तुलसीपूर, जिल्हा बलरामपूर येथे वसतिगृहासाठी असलेली जमीन धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता विकण्यात आली आहे. या जमिनीचे मूल्यांकन दीड कोटी असून, ती नाममात्र 17 लाख रुपयांना विकून तो निधी विश्वस्त स्वतःकडे बाळगत होते. मात्र, अंतर्गत व्यवहाराची बोंबाबोंब लक्षात आल्यावर मुख्य कार्यालयात कोणालाही थांगपत्ता लागू न देता रक्कम जमा करून विषय थांबविण्याचा प्रयत्न सचिव, अध्यक्ष आणि वरिष्ठ सदस्य यांनी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तोंड उघडणार्‍या सदस्याला कोणतीही पूर्वसूचना न देता पदमुक्त करण्यात आले. हे करण्यामागे वेगळी खेळी होती. ती म्हणजे, देशमुख आणि वरिष्ठ सदस्य यांच्या मुलांना संस्थेत सदस्य करून घेण्यासाठी मार्ग मोकळा करणे. असे केल्यास त्या जमिनी विकताना कोणीच आवाज करणार नाही, हा उद्देश होता. खेळीत यश आल्याने देशमुख यांनी संस्थेचे वेगवेगळ्या शाखांचे ऑडिट विवरण तसेच मागील सदस्यांची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे केली नाही, हे दिसते.

मुंबई, पुण्याच्या जागांबाबत सचिवांवर गुन्हे…
संस्थेचे सचिव असलेल्या मिलिंद देशमुख यांनी याआधी मुंबई, अलाहाबाद इथल्या जागांबाबतसुद्धा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे नागपूर शाखेच्या सदस्यांना माहीत झाले. त्यानंतर देशमुख यांनी कट रचून त्या सदस्यास बाहेर काढले. देशमुख यांच्याविरोधात गंभीर गुन्हे असूनही अध्यक्ष व कार्यकारिणी हे कुठलीही कारवाई न करता त्यांची पाठराखण करीत असल्याचे दिसते. शिवाय, पोलिस आयुक्तांना उच्च न्यायालयाने निर्देशित करूनही त्यांनी शपथपत्र दाखल केले नाही. तूर्त देशमुख पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन आले आणि फिर्यादी मात्र अजूनही न्यायाची वाट बघत आहेत. मुंबई येथील मालमत्ता तसेच पुण्यातील 16 एकर जमीन हडप करण्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना गोखले इन्स्टिट्यूटसारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत सचिव हे कार्यकारिणी सदस्य, कुलगुरू यांच्या मर्जीने निवडले गेले. कारण, कुलगुरूसुद्धा जुगाड पद्धतीने निवडले, हा गौप्य तपासाचा भाग आहे.

धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार...
याआधी संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच वरिष्ठ सदस्य यांच्याविरोधात विश्वस्त बरखास्तीसाठी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली गेली. असे असले तरी संस्थेचा कोरम पूर्ण नसतानाही देशमुख यांनी त्यांच्या मुलांना सदस्य बनविण्यासाठी मुख्य कार्यालय सोडून उत्तराखंडात बाजपूर येथे बैठक घेऊन परस्पर सदस्य निवड केली. आता धर्मादाय आयुक्तांच्या मध्यस्थीने या संस्थेत तात्पुरता समेट घालून अध्यक्ष व सचिव यांनी आपल्या मुलांना सदस्य करून घेण्यात यश मिळविले आहे.

SCROLL FOR NEXT