रघुनाथ कसबे
बिबवेवाडी : गेल्या पंधरवड्यात मराठवाड्यातील काही ठिकाणी व धाराशिवमधील परांडा, भूम, सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ या ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना पुन्हा फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यासाठी चौकाचौकांत व पुणे शहरातील ठिकठिकाणी हाताची टाळी मारून आणि या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जोगवा मागून डॉ. अमित ऊर्फ आमपाली मोहिते या तृतीयपंथींनी पूरग्रस्तांसाठी एक आगळीवेगळी मदत उभारली असून, ती लवकरच परांडा, माढा, मोहोळ या तालुक्यातील गावोगावी जाऊन पोहोच करणार आहेत.(Latest Pune News)
पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच, मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या निसर्गाच्या प्रकोपापुढे माणूस हतबल झाला असून, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मी माझ्या परीने पुणे शहरातून दारोदारी आणि चौकाचौकांत फिरून मिळेल तिथे जोगवा गोळा केला, आहे तो जोगवा पूरग्रस्त बंधू-भगिनींच्या व कुटुंबीयांना मी देणार आहे, असे आमपाली मोहिते यांनी सांगितले.
आठ दिवसांपासून जवळपास 40 कट्टे तांदूळ, 350 ब्लॅंकेट, 500 सॅनिटरी पॅड, 1000 वह्या, चणाडाळ, 10 तेलाचे डब्बे, दोन पोती साखर, 20 किलो चहापावडर, गव्हाचे पीठ व इतर मसाला साहित्य गोळा केले आहे. ते पुढील आठवड्यात मी स्वतः कार्यकर्त्यांना घेऊन जाऊन घरोघरी पोहोच करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आजपर्यंत मी पुणे शहरातील अनाथ मुलांसाठी तसेच विधवा परित्यक्ता महिलांसाठी टाळ्या वाजून जोगवा गोळा करून मदत केली आहे. समाजात आम्हाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते, मी त्याची पर्वा न करता समाजाचे काहीतरी देणे लागते म्हणून हे छोटेसे काम करीत आहे. पुढेही मी सामाजिक कार्य करीत राहणार आहे.डॉ. अमित ऊर्फ आमपाली मोहिते, तृतीयपंथी