पुणे

मागोवा! सुरेश कलमाडी : सबसे बडा खिलाडी..

Laxman Dhenge

[author title="सुनील माळी" image="http://"][/author]

पुण्यात क्रीडा क्षेत्राला पोषक वातावरण निर्माण करण्यापासून ते ऑलिम्पिक पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या समितीची सूत्रे सांभाळण्यापर्यंतची कामगिरी करणारा क्रीडाप्रेमी खासदार आणि तब्बल दीड दशक पुण्याच्या राजकारणावर, तत्कालिन सत्ताधारी काँग्रेस पक्षावर, महापालिकेच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला नेता असे सुरेश कलमाडी यांचे वर्णन करता येईल. त्या काळातील त्यांच्या समर्थकांकडून देण्यात येणारी घोषणाच सार्थ ठरते… सबसे बडा खिलाडी…

सुरेशभाई नावाने परिचित असलेल्या कलमाडी यांची कारकीर्द होती वादळी, वेगवान, धडाकेबाज, पण वादग्रस्तही. कर्नाटकातल्या मंगलोरच्या डॉ. श्यामराव अन् शांता कलमाडी यांच्या पोटी 1944 मध्ये जन्माला आलेल्या सुरेशभाईंचे शिक्षण पुण्याच्या सेंट व्हिन्सेन्ट आणि फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. त्यांनी 1960 मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमध्ये प्रवेश मिळवला आणि 1964 ते 1972 या काळात पायलटची जबाबदारी पार पाडली. हवाई दलातून स्क्वाड्रन लिडर म्हणून 1974 मधून निवृत्त झाल्यावर या पायलटने राजकीय आकाशात भरार्‍या मारण्यासाठी पंख उघडले…

युवक काँग्रेसमध्ये सुरेशभाईंनी काम करायला सुरुवात केली आणि थोड्याच वर्षांनी म्हणजे 1978 मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या अंगावर आली. ती त्यांनी दोन वर्षे सांभाळली आणि त्यानंतर आणखी दोनच वर्षांनी पक्षाने त्यांना त्यापेक्षा मोठी भरारी मारायची संधी दिली. त्यांना काँग्रेसने 1982 मध्ये राज्यसभेचे सदस्य केले. त्यांची राज्यसभेची दुसरी मुदत 1995 मध्ये संपली. त्यामुळे पक्षाने त्यानंतर लगेच म्हणजे 1996 मध्ये आलेल्या अकराव्या लोकसभेसाठी त्यांना पुण्यातून उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांच्यावर विजय मिळवला. लोकसभेवर ते 1996 मध्ये निवडून गेले तरी ते राज्यसभेचे सदस्य असल्याने त्याआधीच त्यांना तत्कालिन पी. व्ही. नरसिंह राव यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाची संधी दिली.

त्यामुळे काकासाहेब गाडगीळ, मोहन धारिया आणि विठ्ठलराव गाडगीळ या तीन खासदारांपाठोपाठ मंत्रिपद मिळवणारे ते पुण्याचे चौथे खासदार ठरले. त्यांना 1995 मध्ये मिळालेले रेल्वेमंत्रिपद 1996 च्या निवडणुकीने संपुष्टात आले, पण त्या थोडक्या काळात त्यांनी पुण्याला स्वतंत्र डिव्हिजनचा दर्जा दिल्याने रेल्वेच्या पुण्यातील विकासाची दारे खुली झाली. यानंतर मात्र नाट्यमय घडामोडी झाल्या. काँग्रेसमध्ये पुढची संधी न मिळण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि थेट भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकार्‍यांचा फौजफाटा घेऊन कलमाडी पक्षाबाहेर गेले आणि काँग्रेस भवन सुनसान झाले खरे, पण काँग्रेसने विठ्ठल तुपे यांना उभे केले अन् पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांच्या जबरदस्त तुफानात कलमाडी वाहून गेले. यथावकाश कलमाडी यांची घरवापसी झाली आणि त्यांनी पुन्हा काँग्रेसकडून 2004 आणि 2009 च्या लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला.

एका बाजूने सुरेशभाई देशपातळीवरील राजकारण करीत होते तर दुसरीकडे ते पुण्याच्या राजकारणाचेही सूत्रधार ठरले. पुण्याच्या स्थानिक राजकारणाची सूत्रे, सत्तास्थानांचे अधिकार 1991 पासून त्यांच्याकडे होते. तसेच पुणे महापालिकेतील बहुतेक सर्व निर्णय त्यांच्याकडूनच घेतले जात. काँग्रेस सोडल्यावर मात्र पुणे विकास आघाडी या नावाने त्यांनी भाजप-शिवसेनेशी आघाडी करत महापालिकेतील सत्ता वाटून घेतली. कालांतराने आधी राष्ट्रवादी काँग्रेसने आणि नंतर भाजपने काँग्रेसची घोडदौड रोखली.
युवक काँग्रेसपासून खासदारकीपर्यंतची कलमाडी यांची वाटचाल एका बाजूने सुरू असतानाच दुसरीकडे त्यांनी क्रीडा क्षेत्रात संघटक या नात्याने भाग घ्यायला सुरुवात केली होती. अ‍ॅथलेटिक्स आणि इतर खेळांचे संघटक म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांच्यावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी 1996 मध्ये सोपवण्यात आली, ती त्यांनी 2012 पर्यंत पेलली.

देशपातळीवरील काम कमी पडत होते म्हणून की काय, सुरेशभाईंकडे आशियाई अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदाचे काम 2000 मध्ये देण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा संघटनेमध्ये पुण्याच्या लोकप्रतिनिधीने मोलाची कामगिरी करणे हे निश्चितच उल्लेखनीय होते. संघटनेचे काम त्यांच्याकडे त्यापुढची तेरा वर्षे म्हणजे 2013 पर्यंत होते. राष्ट्रकुल स्पर्धांचे पुण्यात 2010 ला त्यांनी केलेले यशस्वी संयोजन आणि त्यानिमित्ताने पुण्यात झालेली रस्त्यांची कामे ही त्यांची जमेची बाजू ठरली. पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी सुरू केलेला आणि अद्यापही सुरू असलेला पुणे फेस्टिव्हल तसेच पुणे आंतरराष्ट्रीय मँरेथॉन यामुळे पुण्याचे नाव जगाच्या पर्यटन-क्रीडा क्षेत्रात पसरले.

राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील एवढी कामे सुरेशभाईंच्या खात्यात असतानाही क्रीडा स्पर्धांमधील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अखेरीस त्यांची प्रतिमा डागाळली. ऑलिम्पिक असोसिएशनने फॉर्म्युला वन स्पर्धेच्या आयोजनासाठी केलेला करार तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील खरेदी व्यवहार वादग्रस्त ठरले. त्यात त्यांच्या विरोधात खटला भरण्यात आला आणि काही काळ ते तुरुंगातही होते, अजूनही त्यांचा निकाल लागलेला नाही. सुरेशभाई काही महिन्यांपूर्वी प्रदीर्घ कालखंडानंतर महापालिकेत काही कामासाठी आले होते, तेव्हा जुन्या काळातल्या त्यांच्या येण्याची साहजिकच आठवण झाली.

पुण्याच्या विकासाला गती देताना त्यांच्याकडून मूलभूत विकासकामांकडे दुर्लक्ष झाल्याचे मत असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला प्रसिद्धीचे वलय होते. उमेदीच्या काळात त्यांचे झपाझप पावले टाकत येणे, सभोवतालचा कार्यकर्त्यांचा गराडा यामुळे आसमंतात चैतन्य निर्माण होई. आता ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेल्या कलमाडींच्या हाती असलेली काठी, मंदावलेल्या हालचाली आणि अगदी दोन-चार एकनिष्ठ कार्यकर्त्यांची साथ पाहणार्‍यांना शब्द सुचले… कालाय तस्मे नम:…

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT