टोमॅटोचा हंगाम वाया Pudhari
पुणे

Price Crash: टोमॅटोचा हंगाम वाया! शेतकऱ्यांना फक्त तोटाच — क्रेटला अवघे १५० ते २५० रुपये भाव

अतिवृष्टी, रोगराई आणि बाजारातील दर कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात; केंद्राकडून निर्यातीचे धोरण मागणीवर

पुढारी वृत्तसेवा

सुरेश वाणी

नारायणगाव: टोमॅटोचे बाजारभाव कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नारायणगाव मार्केटमध्ये गावठी टोमॅटोला २२ किलोच्या एका क्रेटला २५०, तर संकरित टोमॅटोला अवघा १५० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (Latest Pune News)

जुन्नर, आंबेगाव तालुक्यामध्ये दरवर्षी शेकडो हेक्टरमध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. यंदा मात्र मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम टोमॅटोच्या बाजारभावावर झाला. पावसामुळे सुरुवातीपासूनच टोमॅटोला चांगला दर मिळाला नाही. मध्यंतरी महिनाभर चांगला भाव मिळाला असला तरी जास्त काळ हा कमीच दर मिळाला. दिवाळीमध्ये तर टोमॅटोची अत्यल्प दराने विक्री झाली. त्यामुळे यंदाचा सिझनचा वाया गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

अतिवष्टी, ढगाळ तसेच बदलते वातावरण यामुळे टोमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तसेच विविध व्हायरसमुळेही टोमॅटोच्या बागा खराब झाल्या आहेत. पावसामुळे टोमॅटोच्या झाडाला पाने देखील राहिली नाहीत. टोमॅटोला काळ्या डागांचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार महागडी फवारणी करून पीक जगवले आहेत, आता मात्र अपेक्षित दर मिळाला नसल्याने तोडणी, व वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना भरावा लागत आहे.

नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या दररोज सात ते नऊ हजार टोमॅटोच्या क्रेटची आवक होते. दुसरीकडे नाशिक व हिवरगाव आदी भागात टोमॅटोची आवक वाढली आहे. परिणामी बाजारभाव पडल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी हितासाठी केंद्र सरकारने टोमॅटो निर्यातीबाबत धोरण आखावे, अशी अपेक्षा टोमॅटो उत्पादक व्यक्त करत आहेत.

यंदा दोन टप्प्यांमध्ये २६ एकर टोमॅटोची लागवड केली होती. परंतु योग्य बाजारभाव मिळाला नाही. त्यातून ५२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पुढच्या वर्षी टोमॅटो लावावा की नाही? असा प्रश्न माझ्यासह अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुटमार होणार नाही, याची खबरदारी मार्केट कमिटीने घ्यावी अशी अपेक्षा आहे.
दिलीप गांजाळे, टोमॅटो उत्पादक शेतकरी
मंदाच्या वर्षी टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. टोमॅटो नाशीवंत माल आहे. दिवसाआड शेतकऱ्याला टोमॅटो तोडावी लागतात. नारायणगावसह इतर बाजारांतही टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसत आहे. पाऊस कमी झाल्यानंतर टोमॅटोचे बाजारभाव थोडे वाढतील.
सारंग घोलप, संचालक, जुन्नर बाजार समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT