

पुणे : शासकीय कार्यालयात सुविधेपोटी आकारले जाणारे शुल्क नगदी, चेक किंवा डीडीद्वारे होतात, मात्र पोस्टाने आता एक पाऊल पुढे टाकत विविध सुविधांसाठी आकारले जाणारे शुल्क हे ऑनलाइन म्हणजे क्युआर कोडद्वारे नागरिकांना भरता येणार आहे. पोस्टाने सुरू केलेल्या डिजिटल पेमेंट सुविधेमुळे नागरिकांना सुट्या पैशाचा सतावणारा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राचे संचालक अभिजित बनसोडे यांनी केले.(Latest Pune News)
याबाबत माहिती देताना बनसोडे म्हणाले, या नवीन डिजिटल सुविधेमुळे ग्राहकांना व्यवहार अतिशय सुलभ , सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने करता येतील. त्यामुळे सुटे पैसे जवळ बाळगण्याची गरज उरणार नाही. स्पीड पोस्ट, पत्र, स्पीड पोस्ट पार्सल, मनी ऑर्डर या मोठ्या प्रमाणातील टपाल बुकिंग, विविध बिल भरणे, तिकीट विक्री, फिलाटेली तिकिटांची खरेदी तसेच फ्रॅकिंग मशीन रिचार्ज या सर्व सेवांसाठी ग्राहकांना क्युआर कोड स्कॅन करून डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे.
‘डायनॅमिक क्युआर कोड’द्वारे वर्षभरात लाखाहून अधिक व्यवहार
पुणे शहरातील चालू आर्थिक वर्षात सुमारे एक लाखाहून अधिक व्यवहार ‘डायनॅमिक क्युआर कोड’च्या माध्यमातून करण्यात आले आहेत. तसेच पुणे क्षेत्रातील सातारा, सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यामध्ये सुमारे 2 लाख व्यवहार डायनॅमिक क्युआर कोडद्वारे पूर्ण करण्यात आले आहेत.