

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुमारे 1 हजार 285 हेक्टर म्हणजेच अंदाजे 3 हजार एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत 1 हजार 254 हेक्टर क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाली आहे. अतिरिक्त 148 हेक्टर जमीन देण्यास स्थानिक शेतकरी तयार झाले आहेत. या जमिनीची मोजणी पुढील आठवड्यात पूर्ण करून अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.(Latest Pune News)
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार आहे. या गावांतील सुमारे 3 हजार 220 शेतकऱ्यांनी 95 टक्के क्षेत्रासाठी संमतिपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्त केली आहेत. 26 सप्टेंबरपासून सुरू झालेली जमीनमोजणी आत्तापर्यंत उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी आणि कुंभारवळण या गावांत पूर्ण झाली आहे. खानवडी आणि पारगावमधील काही भाग शिल्लक असून, शेतकऱ्यांशी चर्चा करून ती प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
मोजणी आणि अहवाल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उच्चस्तरीय समितीमार्फत भूसंपादन मोबदल्याचा दर निश्चित केला जाईल. दरनिश्चितीनंतर शेतकऱ्यांशी चर्चा करून करारनामा केला जाईल आणि त्यानंतर मोबदला वाटपास सुरुवात होईल. एमआयडीसी कायद्यातील कलम 33 (1) नुसार प्रसिद्धिपत्रक जारी करण्याची तयारीही सुरू आहे. दरनिश्चितीच्या वेळी विकसित भूखंडाचा परतावा वाढविण्याबाबत शेतकऱ्यांचा आग््राह असल्याने राज्य सरकारचा निर्णय काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.