पुणे

याचि देही, याचि डोळा, अनुभवला बीज सोहळा..!

Laxman Dhenge

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा :

आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी ।
सकळा सांगावी विनंती माझी ॥1॥
वाढवेळ झाला उभा पांडुरंग।
वैकुंठी श्रीरंग बोलवितो ॥2॥
अंतकाळी विठो आम्हांसी पावला ।
कुडीसहित झाला गुप्त तुका ॥3॥

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 375 वा अमृत त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठगमन सोहळा (पूर्ती ) अर्थात
श्रीसंत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळा, टाळ-मृदंगाचा गजर आणि 'ज्ञानोबा- तुकोबांच्या' जयघोषात देहूनगरीत दाखल झालेल्या लाखो वैष्णवांच्या मेळ्याने याचि देही याचि डोळा अनुभवला; तसेच नांदुरकीच्या वृक्षावर तुळशीपत्र आणि पानफुलांचा वर्षाव करून लाखो वारकरी, भाविकभक्त देहूतील नांदुरकीच्या वृक्षासमोर नतमस्तक झाले.

जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्यासाठी बुधवार (दि.27) लाखो वारकरी, भाविक तसेच अनेक दिंड्या देहूनगरीत दाखल झाल्या होत्या. श्रीसंत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, श्रीसंत तुकाराम महाराज जन्मस्थान मंदिर व परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता; तसेच बीजसोहळ्यानिमित्त परिसरात हरिपाठ, भजन, कीर्तन आणि टाळ- मृदंगाचा गजर ऐकू येत होता. अवघी देहूनगरी 'ज्ञानोबा- तुकाराम'च्या नामघोषाने दुमदुमली होती. विविध ठिकाणांहून आलेल्या वैष्णवांच्या मेळ्यामुळे देहूनगरीतील वातावरण भारून गेले होते.

वैकुंठस्थान मंदिर आणि परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. लाखो भाविकांनी उन्हाच्या तडाख्यातही तासन्तास रांगेत उभे राहून तुकोबारायांचे दर्शन घेतले. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्रीसंत तुकाराम महाराज बीजसोहळ्याची सुरुवात बुधवारी पहाटे तीन वाजता देहू देवस्थान संस्थानचे विश्वस्त, अध्यक्ष, वंशज; तसेच देहू ग्रामस्थ आणि वारकरी यांच्या काकड आरतीने करण्यात आली. पहाटे चार वाजता श्रींची महापूजा देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आणि भानुदास महाराज मोरे यांच्या हस्ते, तर शिळा मंदिरातील महापूजा विश्वस्त माणिक महाराज मोरे व अजित महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली; तसेच पहाटे सहा वाजता वैकुंठस्थान मंदिर येथे श्रीसंत तुकाराम महाराजांची महापूजा विश्वस्त विशाल महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.

वैकुंठस्थान मंदिर येथे वैकुंठगमन सोहळा कीर्तन

श्रीसंत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त बुधवारी वैकुंठस्थान मंदिर येथे सकाळी दहा ते दुपारी 12 या वेळेत हभप बाप्पू महाराज देहूकर महाराज यांची कीर्तनसेवा झाली. या वेळी श्रीसंत तुकोबांचा निर्वाणाचा अभंग- घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती। मुक्त आत्मस्थिती सांडविन॥1॥ या अभंगावर हभप बाप्पू महाराज देहूकर यांनी निरूपण केले. दुपारी 12 वाजता अंतकाळी विठो आम्हांसी पावला। कुडीसहित झाला गुप्त तुका॥ बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्रीज्ञानदेव…

तुकाराम, असे म्हणताच जमलेल्या लाखो वारकरी, भाविक भक्तांनी आपल्या हातातील पानफुलांचा नांदुरकीच्या वृक्षावर वर्षाव केला. 'ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय' या जयघोषाने अवघी देहूनगरी दुमदुमून गेली. अशा प्रकारे जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सोहळा संपन्न झाल्यानंतर श्रीसंत तुकाराम महाराजांची पालखी दुपारी साडेबारा वाजता वैकुंठस्थान मंदिर येथून मुख्य मंदिराकडे निघाली आणि दुपारी दोन वाजता मंदिर प्रदक्षिणा झाली

सकाळी साडेदहा वाजता पालखीचे वैकुंठस्थानकडे प्रस्थान

संत श्रीतुकाराम महाराज पालखीचे मुख्य मंदिरातून वैकुंठस्थान मंदिराकडे सकाळी दहा वाजता प्रस्थान झाले. हा सोहळा दुपारी पावणेबारा वाजता वैकुंठस्थान मंदिर येथे दाखल झाला. या ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे, तहसीलदार जयराम देशमुख, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी निविदा घार्गे तसेच देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळी देहूच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, मंडल अधिकारी दिनेश नरवडे, तलाठी सूर्यकांत काळे, अतुल गीते आदी मान्यवर उपस्थित होते. घालून मुख्य भजनी मंडपात विसावली.

वारकरी, भाविकांनी फुगड्या खेळून लुटला आनंद

श्रीसंत तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरात आल्यानंतर अनेक महिला, पुरुष भाविक-भक्तांनी या ठिकाणी फेर धरून फुगड्या खेळल्या. एकमेकांच्या चरणांचे दर्शन घेऊन आनंद लुटला.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

बीजसोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत पोलिस आयुक्त, पोलिस उपआयुक्त तसेच पिंपरी -चिंचवड वाहतूक विभाग पोलिस उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय
वाघमारे व त्यांच्या सहकारी पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

देहूनगर पंचायतीच्या वतीने भाविकांचे स्वागत

देहूनगर पंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी बीजसोहळ्यानिमित्त देहूनगरीत आलेल्या वारकरी, भाविकभक्तांना कोणत्याही प्रकारची गैरसोय निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली होती. पाणीपुरवठा विभागाने भाविकांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले होते. तर देहूगाव महावितरण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी विद्युतपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेतली होती.

प्राथमिक आरोग्य केंद्राकडून भाविकांची सेवा

देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने चार ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्र उपलब्ध करून देण्यात आले होते. त्याचा लाभ हजारो भाविक-भक्तांनी घेतला.

जिल्हा, तालुका प्रशासन

पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी-चिंचवडचे अप्पर तहसीलदार; तसेच पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने देखील वारकरी, भाविक-भक्तांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT