लोणी काळभोर: लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरातील थेऊर फाटा येथील गोडाउनमध्ये बनावट गुटखा व सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून अमली पदार्थविरोधी पथक 2 व लोणी काळभोर पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गोडाउनमालक पसार झाला आहे. हा कारवाई गुरुवारी (दि. 4) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
कारखाना चालवणारा रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय 25, रा. काळुबाई मंदिराजवळ, पत्रावस्ती, थेऊर, ता. हवेली), साथीदार रामप्रसाद ऊर्फ बापू प्रजापती (वय 50, रा. थेऊर, ता. हवेली, मूळ उत्तर प्रदेश), अप्पू सोनकर (वय 46, रा. कांबळेवस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली), दानिश खान (वय 18, रा. कांबळेवस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. यांपैकी गुप्ताला अटक करण्यात आली आहे, तर गोडाऊनचा मालक सुमीत गुप्ता पसार झाला आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्यासह पोलिस कर्मचारी राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकास थेऊर फाटा परिसरात सुमीत गुप्ताच्या गोडाउनमध्ये बनावट गुटखा बनवला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने लोणी काळभोर पोलिसांच्या सहकार्याने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या वेळी गुटखा वाहतूक करण्यासाठी मॉडिफाय केलेली 50 लाखांची 3 वाहने, 1 लाख 30 हजार रुपयांची रोकड, बनावट गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, रसायन, थंडक, गुलाबपाणी, सुपारी, पाकिटे, बॉक्स, पोती आदी साहित्य मिळून आले.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहायक पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईतून परिसरातील बनावट गुटखा रॅकेटचे मोठे जाळे उघडकीस आले असून, पुढील तपास सुरू आहे.