पुणे

परवानगीशिवाय पाणी चोरी; तीन शेतकर्‍यांवर गुन्हा

Laxman Dhenge

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा : कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 नारायणगाव यांच्या परवानगीशिवाय पाणी चोरी करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी मलठण (ता. शिरूर) येथील तीन शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल केला. बुधवारी ( दि. 20) रात्री अकराच्या सुमारास मलठण (शिंदेवाडी ) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी बिनागीर भाऊसाहेब गोसावी यांनी शिरूर पोलिसांत फिर्यादी दाखल केली. त्यानुसार सुरेश पांडुरंग गायकवाडसह इतर तीन शेतकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बुधवारी ( दि. 20) रात्री अकराच्या सुमारास मलठण (शिंदेवाडी ) येथे कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1 नारायणगाव यांच्या परवानगी शिवाय सुरेश गायकवाड व इतर तीन साथीदारांनी विमोचक 54 चे गेट तोडून नुकसान केले. पाणी चोरून वापरून सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. तसेच शिवीगाळ, दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार उमेश भगत करत आहेत.

पाण्यासाठी संघर्षाची तयारी

उन्हाची तीव्रता वाढल्याने या भागातील पिके पाण्याविना होरपळू लागली आहेत. जवळपास 26 दिवसांपासून कालव्याचे पाणी सुरू असून, मलठण गावातील शेतकर्‍यांना पाणी मिळत नव्हते. याबाबत वारंवार पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना विनंती करूनही पाणी न दिल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, पाण्यासाठी वाटेल तो संघर्ष करण्याची तयारी असल्याचे येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष नाना फुलसुंदर यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींनी न्याय द्यावा

दरम्यान, गेल्या वर्षाची पाणीपट्टी भरली असतानाही आमच्यावर अन्याय का ? असा प्रश्न येथील शेतकरी विचारत आहेत. कालव्याला पाणी सुरू असतानाही आपली पिके जळत आहेत हे पाहून पाणी उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल झाल्याचे समजताच इतर शेतकरी आक्रमक झाले असून, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT