Himachal Pradesh political crisis | हिमाचलमधील सुक्खू सरकार डळमळीत?; काँग्रेसच्या ६ बंडखोरांसह ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Himachal Pradesh political crisis | हिमाचलमधील सुक्खू सरकार डळमळीत?; काँग्रेसच्या ६ बंडखोरांसह ३ अपक्ष आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढारी ऑनलाईन : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसच्या ६ बंडखोर आमदारांनी आज शनिवारी (दि.२३) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये सुधीर शर्मा, रवी ठाकूर, इंदर दत्त लखनपाल, देवेंद्र भुट्टो आणि चैतन्य शर्मा यांचा समावेश आहे. तसेच येथील तीन अपक्ष आमदार आशिष शर्मा, केएल ठाकूर आणि होशियार सिंह यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. हिमाचलचे भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव बिंदल आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. यामुळे काँग्रेसचे हिमाचल प्रदेशातील मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सरकार डळमळीत झाले आहे. तीन अपक्ष आमदारांनी काल शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी कमळ हाती घेतले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आमदारांचा भाजप प्रवेश काॅंग्रेस सरकारसाठी चिंतेचा विषय मानला जात आहे. (Himachal Pradesh political crisis)

काँग्रेस विरोधात जनतेचा रोष- अनुराग ठाकूर

यावेळी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, त्यांच्यामुळे भाजप आणखी मजबूत होईल. कारण त्यांनी राज्यातील काँग्रेस सरकार त्यांची आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप केला. ठाकूर पुढे म्हणाले की, या नेत्यांनी नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला, ज्यातून काँग्रेसविरोधातील "जनतेचा रोष" दिसून येतो.

राज्‍यसभा निवडणुकीवेळी क्रॉस व्होटिंग केलेल्‍या काँग्रेसच्‍या या ६ आमदारांवर पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत  कारवाई  करण्यात आली होती. त्यांना विधानसभा अध्‍यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी २९ फेब्रुवारी रोजी अपात्र ठरवले होते. काँग्रेस आमदार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत बंडखाेर ६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या सहा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचल प्रदेशच्‍या राज्यसभेच्या जागेवर  काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा भाजपच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला होता.

हिमाचलमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. आता काँग्रेसचे हे ६ आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

२०२२ मधील विधानसभा निवडणुकीत ६८ सदस्यांच्या राज्य विधानसभेत काँग्रेसने ४० आमदारांसह स्पष्ट बहुमत मिळवले होते. तर भाजपला केवळ २५ जागा मिळाल्या होत्या. पण, आता ६ आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे काॅंग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ३४ वर आले आहे. (Himachal Pradesh political crisis) 

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news