पुणे

ओबीसींच्या वाट्याचं काढून मराठ्यांना देऊ नये : नारायण राणे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजाच्या वाट्याचं काढून ते मराठ्यांना देऊ नये, या मताचा मी आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा अभ्यास करणे आवश्यक असून, ते अजून लहान आहेत, असे मत भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.
पुण्यात गुरुवारी राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, की कुठल्याही नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावू नये. 52 टक्क्यांपुढे भारतीय घटनेनुसार सर्वेक्षण करून एखाद्या समाजाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा हक्क राज्य सरकारला आहे. त्यानुसारच माझ्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं, असे राणे म्हणाले.

राणे उवाच्…

  • कोण आहे जरांगे-पाटील? मला माहीत नाही
  • मराठे ओबीसीतून आरक्षण कधीच घेणार नाहीत
  • प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी दंगलीचा आधार विचारावा
  • सर्वेक्षण करून आरक्षण देण्याचा हक्क राज्य सरकारला
  • मराठ्यांत अनेकजण गरीब, आरक्षण गरजेचं

जरांगे-पाटलांबद्दल विचारताच भडकले राणे

मनोज जरांगे-पाटील यांनी 24 डिसेंबरची डेडलाईन मराठा आरक्षणासाठी सरकारला दिली आहे. याबद्दल राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असताना ते भडकल्याचं दिसून आलं. कोण आहे जरांगे-पाटील? मला माहीत नाही. मी त्यांना ओळखत नाही. कशाला तुम्ही त्यांचे सतत नाव घेता? ते अजून लहान असून, त्यांनी अभ्यास करण्याची गरज असल्याचे राणे म्हणाले. मराठे ओबीसीतून आरक्षण कधीच घेणार नाहीत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

'प्रकाश आंबेडकरांना अटक करायला हवी'

प्रकाश आंबेडकर यांना अटक करायला हवी, अशी मागणी राणे यांनी यावेळी केली. चार राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागल्यावर 6 डिसेंबरनंतर देशात काहीही घडू शकतं. महाराष्ट्रात कधीही दंगली घडू शकतात, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार राणे यांनी घेतला. राणे म्हणाले, की माहिती कोणी लपवत असेल तर तोही क्राईम होतो. त्यांना अटक करून माहिती घेतली पाहिजेत. त्यांना दंगलीचा आधार विचारायला हवा. कशी दंगल होणार? कोण करणार? कुठे करणार? हे त्यांच्याकडून माहिती करून घेतले पाहिजेत, असे राणे म्हणाले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT