पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थांच्या भांडवल पर्याप्ततेचे (सी.आर.ए.आर) यापूर्वीच्या परिपत्रकीय सूचना रद्द करण्यात येणार आहेत. तसेच सुधारित परिपत्रकासाठी संस्थांकडून अभिप्राय मागविले आहेत. अनुत्पादक कर्जांबाबतही (एन.पी.ए.) सुधारित परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याचे सहकार आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. नागरी आणि ग्रामीण सहकारी पतसंस्था बाहेरील दायित्व स्वीकारून जिंदगीची निर्मिती करताना स्वीकारत असलेल्या विविध प्रकारच्या जोखिमांचे मोजमाप करण्यासाठी सर्व पतसंस्थांमध्ये एक समान पद्धत व निकष असावेत, याकरिता 23 ऑगस्ट 2022 रोजी परिपत्रक काढले होते.
संबंधित बातम्या :
या परिपत्रकावर वेळोवेळी शंका उपस्थित केल्या जात असल्याने हे परिपत्रक रद्द करून, आवश्यक स्पष्टीकरणासह सुधारित परिपत्रक जारी करणे आवश्यक असल्याचे सहकार अपर निबंधक (पतसंस्था) श्रीकृष्ण वाडेकर यांनी पत्रात म्हटले आहे.
पतसंस्था चळवळ धोक्यात येऊ नये यासाठी परिस्थितीनुरूप लेखा पध्दतीत काही बदल करणे आवश्यक आहे. अनुत्पादक जिंदगी (एन.पी.ए.) वर्गीकरण व तरतुदीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचनांसह सुधारित परिपत्रक निर्गमित करण्यात येणार असल्याचे सहकार उपनिबंधक (पतसंस्था) मिलिंद सोबले यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, सीआरएआर व एनपीएबाबतच्या सहकार आयुक्तालयाने तयार केलेला मसुदा राज्यातील पतसंस्था फेडरेशनकडे पाठवून त्यांच्याकडून अभिप्राय मागविले आहेत.
…तर ते कर्ज खाते एनपीए
एखाद्या मालमत्तेवरील अथवा मुदत कर्ज खात्यावरील देय व्याज अथवा मुदत परतफेड हप्ता किंवा दोन्हीही यापैकी कोणतीही थकीत रक्कम निर्धारित कालावधीपेक्षा अधिक कालावधीसाठी थकीत असल्यास व प्रत्यक्षात वसूल न झाल्यास तसेच खेळते भांडवलासाठी दिलेल्या कॅश क्रेडिट किंवा ओव्हर ड्राफ्ट कर्जाच्याबाबतीत अनियमित दिनांकापासून निर्धारित कालावधीपेक्षा अधिक कालावधी झाल्यास ती मालमत्ता (जिंदगी) अथवा कर्ज खाते अनुत्पादक जिंदगी तथा एनपीए होय.