

एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत चकचकीत आणि गुळगुळीत रस्ते तयार होत आहेत. इतके की, पोटातले पाणी हलत नाही. दुसरीकडे, शहरांमधील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यांतून रस्ता? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मोटारींची अत्याधुनिक मॉडेल्स बाजारात येत आहेत, त्यामुळे वेगमर्यादा ऐंशीपासून ताशी दीडशे किलोमीटरपर्यंत वाढली. वाहतुकीच्या अनुषंगाने नवनव्या सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी त्या सुविधांना संरक्षण कवच देण्यात आपण कमी पडतोय की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती आढळून येते. देशातील रस्ते अपघातांची संख्या बारा टक्क्यांनी वाढल्याचा केंद्र सरकारचा अहवाल सर्व संबंधित घटकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे.
एकेका माणसाचा जीव लाखमोलाचा असताना, इथे दरवर्षी शेकड्यांनी माणसे अपघातात मरत आहेत आणि संख्या दरवर्षी वाढतेच आहे. अपघात वाढण्याची कारणे केंद्र सरकारच्या अहवालात दिली असली तरी केवळ कारणे पुरेशी नसून, त्यावर परिणामकारक उपाययोजनांची गरज आहे. त्या उपाययोजना केवळ कागदावर नव्हे, तर कृतीतून उतरायला हव्यात, त्यातून अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे प्रत्यक्षात आकडेवारीतून दिसायला हवे. परंतु दरवर्षी अशी आकडेवारी आणि कारणे समोर येतात आणि प्रत्यक्षात काहीच फरक पडत नाही. परिणामी, असे अहवाल म्हणजे सरकारी कर्मकांड ठरतात.
यंदाच्या अहवालानुसार 2022 मध्ये एकूण 4 लाख 61 हजार 312 रस्ते अपघातांची नोंद झाली. ज्यामध्ये 1 लाख 68 हजार 491 लोकांचे मृत्यू आणि 4 लाख 43 हजार 366 लोक जखमी झाले. गतवर्षीच्या तुलनेत अपघातात 11.9 टक्क्यांनी वाढ झाली. मृतांमध्ये 9.4 टक्के, तर जखमींच्या संख्येत 15.3 टक्के वाढ झाली. अतिवेग हे रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, मद्यपान करून चालवणे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष; यामुळेही अपघातात वर्षानुवर्षे वाढ होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गाड्यांना वेग प्रचंड असतो. वेग वाढविण्यासाठी चालकाकडे कोणतेही वेगळे कौशल्य गरजेचे नसते. परंतु वेगावर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या कौशल्याचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे अपघात आणि त्यामध्ये मनुष्यहानी होत असते. परिवहन विभाग वाहन चालवण्याचे परवाने देतो; परंतु त्यासाठी ज्या कठोर कसोट्या असायला हव्यात, त्यांचा अभाव असल्यामुळेच अशा गोष्टींना चालना मिळते, हे लक्षात घ्यावयास हवे. 2022 मध्ये देशातील प्रत्येक शंभर अपघातांमध्ये 36 मृत्यू झाले. चंदीगड, मध्य प्रदेश, दिल्ली याठिकाणी अपघातांचे प्रमाण कमी असून बिहार, पंजाब, झारखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थानमध्ये तुलनेने अधिक मृत्यू झाले. वेगाचे वेड माणसाला मृत्यूच्या दरवाजापर्यंत घेऊन जाते, याची कल्पना असूनही माणसांची बेदरकार वृत्ती कमी होताना दिसत नाही आणि त्यातूनच अपघातांना निमंत्रण देऊन मरण ओढवून घेतले जाते.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) गतवर्षीच्या अहवालानुसार, देशात 2021 या एका वर्षात 1 लाख 55 हजारांहून अधिक लोकांचे बळी रस्ते अपघातात गेले. एका व्यक्तीचा बळी म्हणजे ते कुटुंब उघड्यावर पडणे आणि एवढे बळी म्हणजे तेवढी कुटुंबे उघड्यावर पडणे आणि मोठ्या संख्येने मुले अनाथ होणे, हे समजून घेतले तर अपघातांचे गांभीर्य अधिक तीव्रतेने लक्षात येऊ शकेल. तो एक स्वतंत्र प्रश्न झाला आहे. एवढे भीषण चित्र सातत्याने समोर येत असताना, त्यासंदर्भातील खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
जगण्याची शर्यत तीव्र बनली आहे आणि त्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी प्रत्येक जण आटापिटा करीत असतो, त्यातून वेग पकडण्याचा प्रयत्न केला जातो आणि तोच वेग अपघाताला कारणीभूत ठरतो. रस्ता सुरक्षेबाबत सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात असतात, प्रबोधन मोहिमा राबवल्या जात असतात; परंतु त्यांचा म्हणावा तसा परिणाम होत नसल्याचेच उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. चांगले रस्ते आपल्याकडे अपघाताला कारणीभूत ठरतात आणि खराब रस्तेही अपघाताला निमंत्रण देत असतात. वाहन चालवताना घ्यावयाच्या काळजीबाबत वाहनचालकांचे पुरेसे प्रशिक्षण झाले नसल्यामुळे अपघात होत असतात.
जागोजागी टोलनाके उभारून टोलवसुली जोरात चालते; परंतु अपघातग्रस्त वाहनांना सुविधा पुरवण्यात मात्र तत्परता दाखवली जात नाही. याशिवायही अपघाताची अनेक कारणे आहेत. वाहन चालकांची बेशिस्त वृत्ती आणि बेदरकारपणा हे त्यापैकी एक महत्त्वाचे. गुळगुळीत रस्ता आहे म्हणून वेगाच्या मर्यादेचे भान राहत नाही आणि ओव्हरटेक करतानाही लेनची शिस्त पाळली जात नाही, त्यामुळे अपघात हमखास होतात. यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ही मालिका थांबत नाही.
वार्षिक अहवालातून जेव्हा रस्ते अपघातातील मृतांची आकडेवारी समोर येते, तेव्हा पुन्हा सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होतात आणि उपाययोजनांची चर्चा सुरू करतात. ही चर्चाही पुन्हा तेवढ्यापुरतीच असल्याचा आजवरचा अनुभव आहे. अपघात यांत्रिक दोषापेक्षाही मानवी दोषाने अधिक होत असल्याचे आढळून येते. गाडीचा तोल जाणे, संतुलन बिघडणे, नियंत्रण सुटणे तसेच रस्त्यात अचानक वाहनासमोर कुणी येणे, अशा स्थितीत अनेक अपघात होतात. दुसरीकडे, आपण त्यातून काय शिकलो आणि किती जीव वाचवतो? पुढारलेल्या देशांमध्ये अपघात होऊ नये यासाठी उत्तम खबरदारी घेतली जाते.
शालेय स्तरापासून मुलांच्यामध्ये वाहतूक-संस्कृती रुजवण्याचे प्रयत्न केले जात असतात. आपल्याकडे त्याकडे शाळाबाह्य काम म्हणून पाहण्याची, आपला त्याशी संबंधच जोडला न जाण्याची दक्षता घेण्याकडे प्रवृत्ती बळावते. त्यामुळेच अपघात झाल्यावर तेवढ्यापुरती हळहळ आणि चर्चा होते. मोठमोठ्या घोषणा केल्या जातात. परिस्थिती बदलण्यासाठी किंवा कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी ठोस पावले उचलली जात नाहीत. या मरणाच्या सापळ्यातून माणसाची सुटका करण्याचे मोठे आव्हान आहे. ते सरकार आणि माणूस या दोन्ही पातळीवरच्या सजगतेनेच पार पाडता येऊ शकेल.