बारामती: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. परीक्षा परिषदेने विद्यार्थ्यांना हरकती असतील तर त्या नोंदविण्याचेही आवाहन केले होते. परंतु, हरकतींवर निर्णय न घेताच परीक्षा परिषदेने अंतरिम निकाल जाहीर केल्याचा आरोप परीक्षार्थींकडून होतो आहे.
काही प्रश्नांच्या उत्तराबाबत संदिग्धता कायम आहे. याप्रकरणी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी परीक्षा परिषदेला उत्तराबाबत आव्हान दिले आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करीत अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला. त्याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता काही प्रश्नांच्या फेरपडताळणीची मागणी केली आहे. टीईटी परीक्षा शिक्षकांसाठी बंधनकारक केल्याने यंदा राज्यभरात अनेक विद्यार्थी, शिक्षक या परीक्षेला बसले होते. 23 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा पार पडली. तिचा निकाल शुक्रवारी (दि. 17) जाहीर करण्यात आला. गतवर्षापेक्षा निकालात वाढ झाली. दहा टक्क्यांहून अधिक निकाल लागला आहे. परंतु, अंतिम उत्तरसूचीबाबत विद्यार्थ्यांसह शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते गोंधळ उडालेला आहे.
टीईटी पेपर-2 मधील प्रश्नपत्रिका संच कोड-एमधील मानसशास्त्र विषयातील प्रश्न क्रमांक 65, 66 व 78 या तीन प्रश्नांच्या उत्तराची व समाजशास्त्र विषयातील प्रश्न क्र. 100 या अशा एकूण चार प्रश्नांच्या उत्तरांची फेरपडताळणी होऊन विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. या तिन्ही प्रश्नांच्या उत्तराबाबत मतमतांतरे आहेत. परंतु, शिक्षणव्यवस्थेत जी पुस्तके प्रमाण मानली जातात, त्यातील उत्तर ग््रााह्य धरले नसल्याचे दिसून आले आहे. त्याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. परीक्षा परिषदेने हरकतींबाबत योग्य विचार न केल्याने सर्व प्रवर्गांतील ज्या विद्यार्थ्यांना एक ते दोन गुण कमी पडले आहेत, ते सर्व जण अपात्र ठरले आहेत. वास्तविक, परीक्षा परिषदेने हरकतीचा विचार केला असता तर ते विद्यार्थी पात्र ठरले असते. त्यामुळे आता निकालानंतर याप्रकरणी विद्यार्थ्यांनी फेरपडताळणीची मागणी केली आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून ही मागणी होत असून, परीक्षा परिषद यासंबंधी काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
या प्रश्नांवर आक्षेप
या संचातील प्रश्न क्र. 65 - ’बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र’ या डॉ. ह. ना. जगताप आणि ’शैक्षणिक मानसशास्त्र’ या प्रा. के. व्ही. कुलथेलिखित पुस्तकानुसार सांघिक खेळ हे बाल्यावस्थेचे, तर एकाकी खेळ किंवा समांतर खेळ हे शैशवावस्थेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. प्रश्न क्र. 66 बाबत (मॅक्डुगल सहजप्रवृत्ती) : मॅक्डुगल यांच्या वर्गीकरणानुसार कुतूहल ही प्रवृत्ती ज्ञानात्मक प्रक्रियेशी संबंधित आहे. तर आत्मप्रतिष्ठा ही आत्मनिष्ठ या भावनेतून येते. ’शैक्षणिक मानसशास्त्र’ हे डॉ. ग. बा. बापट यांचे पुस्तक त्यासाठी प्रमाण मानले जाते.
प्रश्न क्र. 78 बाबत एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते, या साहचर्याच्या नियमाचे उत्तर सानिध्याचा नियम, असे आहे. यासंबंधी ’विकास आणि अध्यययनाचे मानसशास्त्र’ हे डॉ. किशोर चव्हाण यांचे पुस्तकही आहे. त्याच्या उत्तराबाबत आक्षेप घेतला गेला होता. हेच प्रश्न अन्य संच कोडमध्ये इतर अनुक्रमांकांवर आहेत. परंतु अंतिम उत्तरसूचित बदल केला गेला नाही. त्यासंबंधीच्या हरकतीवरसुद्धा निर्णय घेतला गेलेला नाही.
पेपर दोनमधील समाजशास्त्र विषयातील संच-ए मधील प्रश्न क्र. 100 या प्रश्नाचे जे पर्याय दिलेले आहे, त्यात उत्तर मिळत नाही. इयत्ता नववीतील पाठ्यपुस्तकातील पान क्र. 24 ते 26 हा संदर्भ त्यासाठी असून. त्या आधारे हा प्रश्न रद्द केला जावा अथवा त्याचे गुण दिले जावेत, अशी मागणी होत आहे.