

दौंड: दौंड-पाटस रोडवरील गिरीम गावच्या हद्दीतील हॉटेल जंगदंबामध्ये दि. 7 जानेवारी रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दहा कामगार भाजले होते. त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेप्रकरणी दौंड पोलिसांनी अखेर सोमवारी (दि. 19) मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल व्यवस्थापकाला अटक केली आहे. याबाबत दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाल पवार यांनी माहिती दिली.
हॉटेलमधील स्फोटानंतर हॉटेलमालक किरण आबा सौताडे व व्यवस्थापक लहू विश्वनाथ जांभळे (दोघेही रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे फरार झाले होते. मात्र, पोलिसांचा संथ तपासावर मोठी टीकेची झोड उठू लागली. त्यानंतर दौंड पोलिसांनी या हॉटेलचा व्यवस्थापक लहू विश्वनाथ जांभळे याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गोपाल पवार यांनी दिली. यावेळी गोपाल पवार म्हणाले, या व्यवस्थापकाकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घरगुती वापरण्याचा गॅस कोणाकडून घेतला होता व त्यांना घरगुती वापराचे एकदम 14 ते 15 सिलिंडर दिलेच कसे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.
दरम्यान, घटनेनंतर 80 टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेल्या कामगारांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना नातेवाईकांनी देखभालीचे कारण सांगत आपल्या गावी आग््राा येथे नेले. परंतु वाटेतच पाच जणांचा मृत्यू झाल्याचे दौंड पोलिसांनी सांगितले होते. आता याप्रकरणी राजकीय हस्तक्षेपाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पुढे काय होते हे पाहणे गरजेचे आहे.