पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील नवीन रुग्णालयाचे खासगीकरणाचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला होता. मात्र, रुग्णालयात सध्या महापालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार केले जात आहेत.
त्यामुळे रुग्णालयाच्या खासगीकरणास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयाचे खासगीकरण काही महिन्यांसाठी लांबणीवर पडले आहे.
महापालिकेने भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामागील मोकळ्या जागेत रुग्णालयाची प्रशस्त इमारत उभारली आहे. त्या रुग्णालयाचे खासगीकरणास सर्वसाधारण सभेने 4 फेब्रुवारी 2019 ला मंजुरी दिली आहे.
त्या निर्णयास विरोधकांनी मोठा विरोध केला होता. शहरात मार्च 2020 ला कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. तेव्हापासून भोसरी रुग्णालयात महापालिकेच्या वतीने कोरोनाबधित रूग्णांवर उपचार केले जात आहेत. सध्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांवरही त्या रुग्णालयातच उपचार केले जात आहेत.
कोरोना संक्रमणाची बाब लक्षात घेऊन हे रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यास देण्याच्या ठरावास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे. ते रुग्णालय महापालिकेच्या वतीने सुरू ठेवण्यास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे खासगीकरण काही महिन्यांसाठी लांबणीवर पडले आहे.
https://youtu.be/Qjmx0ZJ6Xx4