पुणे : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 नुसार पदभरती सन 2024-25 च्या संचमान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करण्यात येणार आहे. त्यासाठी बिंदुनामावली प्रक्रिया तातडीने पूर्ण करा असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत.(Latest Pune News)
सिंह यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी माहे मे-जून, 2025 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 चे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेतील पात्र उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय या निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मुलाखतीशिवाय या प्रकारात तर ज्या शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थाथापनांकरीता मुलखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने दोन निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
मागील पदभरतीच्या टप्पा-2 मध्ये सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. त्यामुळे 27 फेबुवारी 2024 नंतर बिंदुनामावली तपासलेली असेल तर पुन्हा बिंदुनामावली तपासण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी तपासली नाही त्यांनी मात्र ती तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे. तसेच आदिवासीबहुल संबंधित 8 जिल्ह्यातील (नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली) सुधारित आरक्षण व बिंदुनामावलीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. त्यानुसार सर्व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदुनामावली तपासून घेण्यात यावी.
बिंदुनामावलीबाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारीची शहानिशा करूनच पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये, यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे विचारात घेऊन घेऊन बिंदुनामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. विभागीय शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / (माध्यमिक) यांच्या कार्यालयस्तरावर बिंदुनामावली तपासणी व विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावी. कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी, तसेच अन्य राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा. पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदुनामावली न तपासण्याची करणे सयुक्तिक होणार नाही. यासाठी पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसेच बिंदुनामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाची किती रिक्त पदे आहेत इत्यादीबाबतच्या माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी. यामुळे जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही असे देखील शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.