तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे प्रापंचिक कारणातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी हतोडीने प्रहार करत पत्नीचा खून करून पती स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि. 18) पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली.
सविता मनोहर कांबळे (वय 38, सध्या रा. आरंभ सोसायटी, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ रा. श्रीरामनगर शिरसो, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे खून झालेल्या महिलेचे, तर मनोहर नागोराव कांबळे (वय 53, सध्या रा. आरंभ सोसायटी, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ रा. श्रीरामनगर शिरसो, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत राजेश मनोहर कांबळे (वय 19, सध्या रा. आरंभ सोसायटी तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, मूळ रा. श्रीरामनगर शिरसो, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) याने फिर्याद दिल्याने पोलिसांनी मनोहर कांबळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
शिक्रापूर (ता. शिरूर)चे ठाणे अंमलदार पोलिस हवालदार अमोल चव्हाण, पोलिस जवान मच्छिंद्र निचित, नागेश वाघमारे हे पहाटेच्या सुमारास कर्तव्यावर हजर असताना अचानक मनोहर कांबळे हा पोलिस ठाण्यात आला. त्याने मी माझ्या बायकोचा खून केला असल्याचे पोलिसांना सांगितल्याने पोलिस गोंधळून गेले. दरम्यान, पोलिस जवान मच्छिंद्र निश्चित व नागेश वाघमारे यांनी मनोहरला ताब्यात घेत त्याच्या तळेगाव ढमढेरे येथील घरी घेऊन पाहणी केली. यावेळी मनोहर याची पत्नी सविता कांबळे घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती.
शेजारीच लोखंडी हतोडी पडल्याचे पोलिसांना दिसून आल्याने पोलिसांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने सविता कांबळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; मात्र, सविता कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान, पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस हवालदार चंद्रकांत काळे, प्रतीक जगताप आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप या घटनेचा तपास करीत आहेत.