तळेगाव ढमढेरे: करंदी (ता. शिरूर) येथील नप्तेवस्ती पाझर तलाव येथे रात्री एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बिबट्या शिरला. ही घटना समजताच वस्तीत खळबळ उडाली. तब्बल एक तास नागरिकांनी बिबट्याचा थरार पाहिला, मात्र बिबट्याने मोकळ्या शेतात धूम ठोकली. (Latest Pune News)
करंदी येथील नप्तेवस्ती येथे प्रकाश ठाकर यांच्या गोठ्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या शिरला आणि जाळीमध्ये अडकला असल्याची माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना मिळताच नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील, वनविभाग रेस्क्यू टीम मेंबर व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, अमोल कुसाळकर, वैभव निकाळजे, शुभम माने, पोलिस पाटील वंदना साबळे, आपदा मित्र महेश साबळे, राघू नप्ते आदी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जास्त नागरिक व कुत्र्यांच्या भुंकण्याने बिबट्या थेट
गोठ्यातील झाडावर चढला. त्यानंतर वन विभाग रेस्क्यू टीमने बिबट्याला पकडण्याची कार्यवाही सुरू केली. मात्र अर्थ्या तासानंतर बिबट्याने झाडावरून थेट खाली उडी मारून शेजारील शेतात धूम ठोकली. या वेळी कांताराम नप्ते, अनिल नप्ते, धनंजय नप्ते, सागर झेंडे, प्रकाश ठाकर, पोपट ठाकर, काळूराम ठाकर, शंकर टेमगिरे, दीपक खेडकर, सोमनाथ मुरकुटे, गणेश पिंगळे आदी उपस्थित होते. तर बिबट्याने धूम ठोकल्याने नागरिकांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नियतक्षेत्र वनाधिकारी सोपान अनासुने व पोलिस पाटील वंदना साबळे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांना मार्गदर्शन करत खबरदारीचे आवाहन केले आहे.
इनामगावातील नलगेमाळ येथे बिबट्या जेरबंद
मांडवगण फराटा इनामगाव येथील नलगेमाळ (ता. शिरूर) परिसरात शुक्रवारी (दि. 24) पहाटे शेतकरी सुरेश मचाले यांच्या शेतात नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जरबंद झाला. पकडलेला बिबट्या सुमारे सहा वर्षांचा असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच शिरूर वन परिक्षेत्र अधिकारी नीळकंठ गव्हाणे, वनपाल भानुदास शिंदे, वनरक्षक गणेश डोईफोडे, शेखर जानगवळी तसेच रेस्क्यू पथकातील गोविंद शेलार, नवनाथ गांधले, शरद गदादे, मनोज चौधरी, अमोल पाटोळे, सुधीर शितोळे, सुनील कळसकर, रोहिदास शेंडगे, संदीप गव्हाणे, राहुल अवचिते, शरीफ शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षितरित्या माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात हलवले. श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी संचालक विजयसिंह मोकाशी म्हणाले, “बिबट्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सरकारने आता केवळ जनजागृती न करता प्रत्यक्ष कृती करावी. ”
या भागात सलग उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यांची संख्या मोठी आहे. काही दिवसांत ऊसतोडी सुरू होईल. ऊस तोडणी टोळी दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे पुरेसे पिंजरे उपलब्ध करण्यात यावे, अशी मागणी इनामगावचे सरपंच अनुराधा घाडगे यांनी केली आहे. दरम्यान, आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी गेल्या वर्षभरापूर्वी दीडशे पिंजरे जिल्हा नियोजन समिती निधीमधून उपलब्ध करणार असे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन अद्याप हवेतच विरले आहे.
तळेगाव ढमढेरेच्या जगतापवस्तीत बिबट्या जेरबंद
तळेगाव ढमढेरे परिसरात वारंवार पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जगतापवस्ती येथे अमोल ढमढेरे यांच्या शेतात शिरूर वन विभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. बुधवारी (दि. 22) पहाटेच्या सुमारास वैभव ढमढेरे शेताकडे गेले असता त्यांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. याबाबतची माहिती त्यांनी शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना दिली. वनपरिमंडळ अधिकारी गौरी हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र वनअधिकारी प्रमोद पाटील, वन विभाग रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर, परमेश्वर दहीरे यांनी सदर ठिकाणी जाऊन बिबट्याला ताब्यात घेतले. या वेळी अमोल ढमढेरे, वैभव ढमढेरे, राहुल ढमढेरे, संकेत ढमढेरे, अजय ढमढेरे, योगेश ढमढेरे, आदित्य ढमढेरे आदी उपस्थितीत होते. सदर बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात करण्यात आल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.