तळेगाव ढमढेरे: शिरूर तालुक्यातील ताजणेवस्ती (राऊतवाडी) येथील ओढ्यावरील पुलावरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ताजणेवस्ती येथील हा रस्ता कासारी फाटा येथे पुणे-अहिल्यानगर महामार्गाला जोडलेला असून, राऊतवाडी परिसरात शिक्रापूर-मलठण रस्त्याशी जोडला जातो. ताजणेवस्ती येथील ओढ्यावरील पुलाचे काम तीन ते चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र, पुलावरील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे.
ताजणेवस्तीपासून जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स हा साखर कारखाना जवळच असून, सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू आहे. कोंढापुरी, कवठीमळा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, खंडाळे आदी शिवारांतून व्यंकटेशकृपा साखर कारखान्याकडे होणारी ऊस वाहतूक ताजणेवस्ती-वाबळेवाडीमार्गे मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
ताजणेवस्ती पुलावर तसेच पुलालगतच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने ऊस वाहतूक करणारी जड वाहने हेलकावत मार्गक्रमण करीत आहेत. यामुळे अपघाताची भीती वाढली असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
याच मार्गावरून राऊतवाडी, वाबळेवाडी, बुरुंजवाडी, गणेगाव खालसा, वाघाळे, मलठण, मोराची चिंचोली, पिंपळे खालसा व हिवरे या गावांकडे जाणारी-येणारी वाहनेही मोठ्या संख्येने ये-जा करीत असतात. प्रवाशांचे हित व सुरक्षितता लक्षात घेता ताजणेवस्ती येथील पुलावरील तसेच पुलालगतच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.