

भोर: भोर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालसाठी रविवारी (दि. 21) सकाळी 10 वाजता पाच टेबलांवर मतमोजणीस सुरुवात होणार असून, नगराध्यक्षपदाचा निकाल शेवटच्या फेऱ्यांनंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली. पाच टेबलांवर, पाच पाच फेऱ्यांत मतमोजणी होणार असून, एक तासात निकाल लागणार आहेत.
भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या मतमोजणीला रविवारी (दि. 21) कान्होजी जेधे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलला चार कर्मचारी आणि दोन जण उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून असणार आहेत.
पहिल्या फेरीमध्ये एकमधील प्रभाग क्रमांक एक ते पाच प्रभागांमधील अ क्रमांकाची मतमोजणी होणार, तर दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते पाचमधील ब क्रमांकाची मतमोजणी होणार असून, तिसरी फेरी प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ, दहा अ क्रमांकांची मोजणी होणार आहे.
प्रभाग चारमधील क नंबरची मतमोजणी होऊन फेरी क्रमांक चार प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ, दहा ब आणि प्रभाग क्रमांक नऊमधील अची मतमोजणी होणार आहे. फेरी क्रमांक पाचमध्ये प्रभाग क्रमांक आठ क आणि प्रभाग क्रमांक नऊ बची मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, या सर्व पाचही फेऱ्यांची मोजणी झाल्यानंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचा निकाल बाहेर येणार आहे . एकूण 16 हजार 716 पैकी 12 हजार 865 मतदान झाले आहे. मतमोजणीनंतर साधारणपणे एक ते दीड तासामध्ये निकाल लागेल, असे निवडणूक अधिकार्यांनी सांगितले.