पुणे : स्वारगेट पोलिसांनी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली आहे. बाहेरून हॉटेल बंद करून आतमध्ये हुक्का विक्री केली जात होती. लक्ष्मीनारायण चौकातील मोदी प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एलडिनेरो नावाचे हे हॉटेल असून, त्यामध्ये ही हुक्का विक्री सुरू होती. शटर उघडण्यास सांगितल्यानंतर आतून प्रतिसाद न आल्यामुळे पोलिसांनी थेट अग्निशमन दलाकडून शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तर आत हुक्का पार्लर सुरू असल्याचे दिसून आले.
याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी हॉटेलमालक, मॅनेजर, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. एलडिनेरो हॉटेलमालक विकास मेहता (रा. चव्हाणनगर, धनकवडी), मॅनेजर सनी सुंदर परिहार (वय 33, रा. गुलटेकडी, स्वारगेट) व हॉटेलमधील वेटर दीपकल सतभूषण जैन, मोसिन दिलमोहम्मद शेख, अनमोल सरवन श्रेष्ठ, पर्वत सुरज परिहार, ढोल बहादूर परिहार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिस नियंत्रण कक्षातून स्वारगेट पोलिस ठाण्यास कळविण्यात आले की, लक्ष्मीनारायण चौक येथील मोदी प्लाझा बिल्डिंगमधील एलडिनेरो हॉटेमध्ये हुक्का पार्लर चालू आहे, खात्री करून कारवाई करावी. त्यानुसार पोलिस निरीक्षक विकास भारमळ, पोलिस उपनिरीक्षक सुजाता जाधव कर्मचाऱ्यांसह हे तातडीने मोदी प्लाझा इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर गेले. एलडिनेरो हॉटेलचे शहर आतून बंद होते. शटर उघडण्यासाठी वारंवार आवाज देऊनही हॉटेलच्या आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून घेतले. त्यांनी हॉटेलच्या शटरचे लॉक तोडून दिले.
पोलिसांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला असता आतमध्ये ग््रााहकांकडून रोख रक्कम घेऊन त्यांना तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर ओढण्याकरिता कामगारांकरवी विक्री केली जात होती. हॉटेल मॅनेजर सनी परिहार याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने हॉटेलमालक प्रतीक विकास मेहता याच्या सांगण्यावरुन हॉटेलमधील वेटरमार्फत ग््रााहकांना हुक्का सेवन करण्यासाठी देत असल्याचे सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, 22 हजार 560 रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास भारमळ, पोलिस उपनिरीक्षक सुजाता जाधव यांच्या पथकाने केली.