केडगाव: पाटस येथून सुप्याकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटातील पहिल्याच तीव्र वळणावर बुधवारी (दि. १६) सकाळी साडेसातच्या सुमारास उलटल्याने खळबळ उडाली. या बसमधून सुमारे ६० ते ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रवास करीत होते. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली. मात्र, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बसच धोकादायक वळणावर उलटल्याने पालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या अपघातामुळे सुपे घाटातील धोकादायक वळणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
रस्ता रुंदावला; मात्र धोकादायक वळण कायम
पूर्वी शिरूर-सातारा राज्यमार्ग असलेल्या या रस्त्याचे अष्टविनायक महामार्ग म्हणून रुंदीकरण करण्यात आले. रस्ता रुंद झाला असला तरी सुपे घाटातील पहिल्या वळणावरील तीव्र वळण आणि चढ-उताराची समस्या कायम आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते.
विशेषतः घाटातील उतार आणि त्यानंतर येणारे तीव्र वळण यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित करणे अनेकदा कठीण जाते. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, अवजड मालवाहतूक करणारी वाहने पलटी झाल्याच्या घटनाही परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्या आहेत.
वारंवार अपघात; उपाययोजना कधी?
सुपे घाटातील हे वळण धोकादायक असल्याची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. अवजड वाहनांच्या अपघातांनंतर आता विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटल्याने या रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी या ठिकाणचे तीव्र वळण आणि चढ-उतार दूर करून रस्ता सुरक्षित करण्याची अपेक्षा होती; मात्र, आजही परिस्थिती कायम असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ झाल्यानंतर तरी जाग येणार?
विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण करणारी घटना घडल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल आता पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सुपे घाटातील या तीव्र वळणाची तातडीने पाहणी करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वळणाची रचना बदलणे, चढ-उतार कमी करणे, संरक्षक कठडे उभारणे, योग्य दिशादर्शक व वेगमर्यादा फलक लावणे यासह आवश्यक अभियांत्रिकी उपाययोजना करण्याची गरज आहे.