PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: उमेदवारीची लॉटरी’ ते ‘हॅट्ट्रिक नगरसेवक’—सुहास कुलकर्णींचा थरारक राजकीय प्रवास!

सोबतच्या मित्राविरुद्ध लढावी लागलेली पहिली निवडणूक, 90 टक्के कार्यकर्ते विरोधात… तरीही विजय! कसबा–सबा पेठेतील सुहास कुलकर्णींची रोमांचक कथा त्यांच्या शब्दांत.

पुढारी वृत्तसेवा

सुहास कुलकर्णी

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, भाजपचे नेते, माजी विरोधी पक्षनेते, नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या आपले पुणे, आपला परिसर या संस्थेचे सक्रिय सदस्य, महापालिकेच्या तीनही निवडणुकांत विजयश्री खेचून आणणारे नगरसेवक अशी सुहास कुलकर्णी यांची ओळख. तत्कालीन राजकीय परिस्थितीतून त्यांना उमेदवारीची लॉटरी लागली आणि अत्यंत विपरीत परिस्थितीतही या निवडणुकीत त्यांनी विजयश्री कशी खेचून आणली याची कहानी त्यांच्याच शब्दात...

कसबा पेठेतून महापालिकेची निवडणूक लढवावी लागेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पक्षाचा मी निष्ठावान कार्यकर्ता होतो. पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे एवढीच माझी जमेची बाजू. पण 1992 मधील महापालिका निवडणुकीत परिस्थितीच अशी निर्माण झाली की, वर्षानुवर्षे सोबत काम करणाऱ्या मित्राविरुद्धच निवडणूक लढविण्याची वेळ माझ्यावर आली.

विधानसभेच्या 1990 मधील निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून पक्षाने अण्णा जोशी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात काँग््रेासचे शांतीलाल सुरतवाला होते. वास्तविक अण्णा जोशी हे शिवाजीनगर मतदारसंघातून निवडून आलेले असल्याने ते तेथूनच लढतील, असे सगळ्यांना वाटत होते. पण युतीच्या वाटाघाटीत शिवाजीनगर मतदारसंघ सोडावा लागला. त्यामुळे अण्णांना कसबा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. या घडामोडीमुळे कसब्याच्या उमेदवारीकडे डोळे लावून बसलेले काही तत्कालीन नेते नाराज झाले. त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे कामच केले नाही. त्यापाठोपाठ 1991 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग््रेासच्या बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्याविरोधात अण्णा जोशी यांना उभे केले गेले. अण्णा खासदार होऊन दिल्लीला गेल्याने लगेचच कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. या वेळी काँग््रेासच्या वसंत थोरात यांच्या विरुद्ध गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. या नाराज गटाने याही निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केले. परिणामी, वसंत थोरात विजयी झाले. त्यामुळे पक्ष विरोधी काम करणाऱ्या तत्कालीन नगरसेवक भगवान देशपांडे यांच्यासह पाच जणांवर कडक कारवाई करण्यात आली. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळे 1992 च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी अण्णा जोशी व गिरीश बापट यांनी कसबा- बुधवार पेठ वॉर्डाच्या (क्र.39) उमेदवारीसाठी माझे नाव पुढे केले. वास्तविक त्यावेळी मी निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत नव्हतो. दुधाच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करून त्याचा विस्तार करण्याचे माझेप्रयत्न सुरू होते. पण पक्षाचा आदेश म्हणून ही निवडणूक लढविण्यास मी तयार झालो.

पक्षाने कारवाई केल्यानंतरही भाजप बंडखोर म्हणून भगवान देशपांडे यांनी या वॉर्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बरीच वर्षे सोबत काम केलेले नगरसेवक देशपांडे निवडणूक लढवित आहेत, म्हटल्यावर पक्षातील बरेच मित्र व कार्यकर्त्यांनी देशपांडे यांना मदत करायचे ठरविले. माझ्या काही नातेवाईकांनीही असुयेपोटी दुसऱ्या कार्यकर्त्याला अर्ज भरायला लावून त्यांना उमेदवारी मिळावी, असे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी माझ्यावर जातीयवादी असल्याचा ठपका ठेवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, अण्णा जोशी व गिरीश बापट हे माझ्या नावावर ठाम राहिल्याने उमेदवारीची माळ माझ्या गळ्यात पडली.

भगवान देशपांडे हे माझेही मित्र होते आणि आजही आहेत. अत्यंत सुस्वभावी व्यक्ती अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढणे हे फारच मोठे आव्हान होते. अशात वॉर्डमधील जवळजवळ 90 टक्के कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेलेले. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि प्रचार करणे खूपच अवघड होते. त्यामुळे दुग्धव्यवसायानिमित्त परिचित झालेले ग््रााहक व परिसरात दुधाचे रतीब टाकणारे काही व्यावसायिक मित्र यांनाच मी मदतीसाठी साकडे घातले. त्यापाठोपाठ या कठीण परिस्थितीत सर्व कुटुंबीय व जवळचे नातेवाईकही मदतीला आले. जिजामाता उद्यान, नानावाडा, तपकीर गल्ली हा परिसर त्यावेळी काँग््रेासचा बालेकिल्ला मानला जात होता. तेथे काम करण्यासाठी आमच्याकडे कार्यकर्तेच नव्हते. त्यामुळे माझे मित्र किरण सरदेशपांडे, अशोक चित्राव आणि इतर अनेकांनी त्या भागात फिरून माझ्यासाठी काम केले. अखेरपर्यंत ही निवडणूक खूप अवघड वाटत होती.

संघाचे तत्कालीन प्रमुख व ज्येष्ठ कार्यकर्ते दादा पारखी व रिसवडकर सर यांनी काही मोजक्या कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार केला. वयाची सत्तरी ओलांडणाऱ्या या ज्येष्ठांचे योगदान माझ्या कायमचे स्मरणात राहिले. त्याचप्रमाणे पतित पावन संघटनेच्या जनाभाऊ पेडणेकरांनीही पंधरा दिवस वार्डात तळ ठोकून भरपूर मेहनत घेतली. मतमोजणी सुरू असतानाही मला विजयाची खात्री वाटत नव्हती. कारण पहिल्या फेरीपासून भगवान देशपांडे हे माझ्यापेक्षा 100 ते 200 मतांनी आघाडीवर होते. परंतु तपकीर गल्लीची मतमोजणी सुरू झाली आणि आश्चर्य घडले. तपकीर गल्लीतील चार- पाच वाडे जे काँग््रेासचे म्हणून ओळखले जात होते, तेथील मतदार एकत्र आले आणि त्यांनी निर्णय घेतला की, या वेळी आपल्या गल्लीतला मुलगा उभा आहे. त्यामुळे आपण काँग््रेासला मतदान न करता सुहासलाच मतदान करायचे. त्यांच्या या निर्णयाचा मला मोठा फायदा झाला. तपकीर गल्लीतील मतपेट्यांची मतमोजणी सुरू झाली तेव्हा मला चांगली आघाडी मिळाली आणि मी साडेतीनशे ते चारशे मतांनी विजयी झालो. मतमोजणीचा तो प्रसंग व ती निवडणूक आठवली की आजही अंगावर काटा उभा राहतो. या निवडणुकीसाठी मला 14 ते 15 हजार रुपये खर्च आला. महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत लालमहाल-कसबा वार्डामधून (क्र. 47) मी उभा राहिलो आणि विजयी झालो. त्या वेळीही फक्त 30 ते 35 हजार रुपये खर्च आला होता. आजही माझ्याकडे त्याचे हिशेब आहेत.

नंतरच्या म्हणजे 2002 च्या निवडणुकीत चारचा प्रभाग (कसबा गणपती- मंडई) झाला. पॅनेलमध्ये मी सीनियर उमेदवार होतो, तर उर्वरित तिघेही नवीन आणि पहिल्यांदाच निवडणूक लढवित होते. माझ्याविरोधात काँग््रेासचे ताकदवार उमेदवार बाळासाहेब मारणे उभे होते. तरीही चार- पाच हजारांच्या फरकाने आमचे पॅनेल विजयी झाले. 42 हजार मतदार असलेल्या या मतदार संघात त्यावेळी पॅम्प्लेट प्रिंटिंग, बोर्ड, रिक्षातून प्रचार या सगळ्याचा खर्च प्रत्येकी 80 ते 90 हजार रुपये आला. संघामध्ये माझ्यावर झालेले संस्कार, तळागाळातील नागरिकांशी असलेला संपर्क, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची, प्रसंगी त्यांच्यासाठी उभे राहण्याची तयारी या मुळेच या तीनही निवडणुकात मी विजयी होऊ शकलो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT