शिवनगर : पुढारी वृत्तसेवा
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूकदारांनी मंगळवार (दि. २१) पासून विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. त्यामुळे मागील काही तासांपासून गाळप बंद असून प्रत्येक तासाला कारखान्याचे साधारणपणे १३ लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याचा मागील इतिहास पहाता काही वेळा प्रतिदिन उच्चांकी गाळप सुरू असताना संपाची ठिणगी पडल्याने कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे यामधून तातडीने मार्ग काढण्याचे प्रयत्न कारखाना प्रशासनाकडून केले जात आहेत. दरम्यान, कारखाना प्रशासनाने संपकरी वाहतूक संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तथापि चर्चा फिसकटल्याने संप सुरू झाला असल्याची माहिती दोन्ही बाजूने देण्यात आली. दरम्यान कारखाना कार्यस्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऊस वाहतूकदारांनी ऊस वाहतूक दर वाढीसह कमीशन वाढवून मिळावे, तसेच संपूर्ण गाळप हंगामात एकाच दराने डिझेल मिळावे, एखाद्या गाडी मालकाचे ऊस तोडणी टोळीकडे पैसे अडकले असेल तर हे पैसे वसूल करण्यात कारखान्याने मदत करावी, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
माळेगाव साखर कारखान्यावर ऊस वाहतूक संघटनेने पुकारलेल्या संपामुळे कारखान्याचे पर्यायाने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमध्ये तीव्र भावना असून होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल केला जात आहे.