Sugarcane Flowering Pudhari
पुणे

Someshwar Sugarcane Flowering: सोमेश्वरनगरमध्ये उसाला तुऱ्यांचे प्रमाण वाढले; साखर उताऱ्यावर परिणामाची शक्यता

हवामानातील बदलामुळे तुरा वाढ — ऊस विकास अधिकारी विराज निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात यंदाच्या हंगामात पाऊस, तापमान, आर्द्रता आणि प्रकाशमानातील बदल यामुळे तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे.

उसाला तुरे येणे ही नैसर्गिक व शास्त्रीय प्रक्रिया आहे. त्यावर जातीचे गुण, हवामान, प्रकाश कालावधी, जमिनीचा प्रकार आणि नत्राचे प्रमाण यांचा मोठा प्रभाव असतो. काही ऊस जातींना लवकर तर काहींना उशिरा तुरे येतात. विशेषतः ऑगस्ट-सप्टेंबरमधील सलग आर्द्रता, पुरेसा प्रकाश व पावसामुळे फुलकळी तयार होऊन तुरा तयार होतो.

मे-जून महिन्यात केलेल्या आडसाली लागवडीच्या उसाला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अनुकूल हवामान मिळाल्यास त्याला त्याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तुरा येऊ शकतो. खोडवा उसास तुरे येण्याचे प्रमाण जास्त आढळते. तुऱ्याचा ऊस उतारा आणि वजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तुरा आलेला ऊस दीड-दोन महिने उभा राहिल्यास पोकळ पडणे, पांगशा फुटणे, दशी पडणे असे प्रकार वाढतात. साखरेचे विघटन वाढून साखर उताऱ्यात घट होते. तंतूमय पदार्थ वाढल्यामुळे रसकाढ्यातही 18 ते 20 टक्के कमी येऊ शकते. यावर्षी ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये झालेल्या जास्त पावसामुळे ही स्थिती अधिक आढळत आहे.

शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजना

तुरा येण्याच्या काळात पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवणे, नत्राचे संतुलित व्यवस्थापन करणे तसेच निंबोळी पेंडीचा वापर केल्यास तुरे येण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

तुरा आल्यावर उसाच्या कांड्यांची वाढ थांबते, पाने अरुंद होतात आणि पिवळसर होतात. पोंग्यातील कोंबाची वाढ थांबून तुऱ्याची वाढ सुरू होते. सुरुवातीस पक्वता वाढून रसाची शुद्धता वाढते, परंतु, पुढील काळात उताऱ्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. सोमेश्वर कार्यक्षेत्रात वाढलेले तुऱ्याचे प्रमाण लक्षात घेता कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिले जात आहे.
विराज निंबाळकर, ऊस विकास अधिकारी, सोमेश्वर कारखाना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT