पुणे: जुलै महिन्यासाठी घोषित केलेल्या साखरेच्या २२ लाख ५० हजार टनाइतक्या अपुऱ्या कोट्यानंतर सुरू असलेली साखर दरवाढ कायम आहे. ऑगस्ट महिन्यातील साखर निविदा वाढून ४६५० ते ४७०० रुपयांवर पोहोचल्या आहेत. घाऊक बाजारात एस ३० ग्रेड साखरेचे दर क्विंटलला पुन्हा २०० रुपयांनी वाढून ४९५० ते ५००० रुपये या उच्चांकी पातळीवर पोहोचले. बाजारपेठांमध्ये सट्टेबाजांच्या सक्रिय सहभागामुळे दरात चौफेर तेजी सुरू झालेली आहे.
दरम्यान, किरकोळ बाजारात साखरेचा भाव प्रतिकिलो ५१ ते ५२ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे या दरवाढीस आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने दोन लाख टनांचा साखरेचा अतिरिक्त कोटा खुला करण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथः ही दरवाढ सुरूच राहण्याचा अंदाज घाऊक बाजारपेठेतून वर्तविण्यात येत आहे. जुलैपासून साखरेचे दर वाढण्यास सुरुवात झाली. देशांतर्गत साखरेचे उत्पादन कमी होण्याचे कारण आणि ऑक्टोबर महिन्यात नवीन हंगामाच्या तोंडावर साखर साठाही कमी राहण्याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर तेजीला उधाण येण्यास सुरुवात झाली.
त्यातच साखरेच्या दरवाढीस आळा घालण्यासाठीच्या उपाय योजनांमध्ये केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर चार हजार क्विंटल इतकाच साखरसाठा ठेवण्याचे बंधन घातले. मात्र, त्याचा कोणताच परिणाम साखर दरवाढीस ब्रेक लावण्यावर झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या महिनाभरात साखरेचे दर क्विंटलला एक हजार रुपयांनी म्हणजे प्रतिकिलोस १० रुपयांनी वधारले आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या घोषित साखर कोट्यानुसार शनिवारी (दि. १) बहुतांश साखर कारखान्यांच्या नवीन निविदा उघडण्यात आल्या. त्यानुसार कारखान्यांकडील साखर खरेदीसाठी चढाओढ होऊन सकाळच्या सत्रात साखर निविदा ४६०० रुपयांनी सुरू झाल्या. त्यानंतर सायंकाळी त्या ४६५० ते ४७०० रुपयांवर पोहोचल्या. आगामी श्रावण महिना, सणासुदीमुळे मागणी वाढण्याचा अंदाज असल्याने तेजीच्या वातावरणात व्यापाऱ्यांकडून साखरेची एक ट्रकऐवजी दोन ते तीन ट्रकइतकी खरेदी होत आहे.
अन्य राज्यांची मागणी कायम
देशातील अन्य राज्यांतून महाराष्ट्रातील कारखान्यांकडे साखरेची खरेदीचे प्रमाण चांगले आहे. त्यातच देशातून छुप्या मार्गाने नेपाळला साखर रवाना होत असल्याची चर्चा आहे. साखरेचे दर सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे आणखी महागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार अतिरिक्त कोट्याबाबत कोणता निर्णय घेणार, यावर साखर दराचे पुढील गणित अवलंबून राहील, असे जाणकार व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.