

शिवदास शितोळे
परिंचे: ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची चिंता पालक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्याची चर्चा आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला जबरदस्तीने घरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्या विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका केली आणि मोठा अनर्थ टाळला.
अनेक शाळा व महाविद्यालय परिसरात टवाळखोर युवकांचा वाढता वावर, विद्यार्थिनींचा पाठलाग, अश्लील शेरेबाजी आणि छेडछाडीच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्याचे सांगितले जाते. विशेषतः सकाळी व सायंकाळी शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत बसस्थानके, मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये संशयास्पद तरुणांची गर्दी असल्याची पालकांची तक्रार आहे.
बदनामीच्या भीतीने अनेक विद्यार्थिनी तक्रार करण्यास धजावत नाहीत. परिणामी, मानसिक त्रास सहन करीत त्या शांत राहणे पसंत करतात. काही ठिकाणी स्थानिक युवकांचा सहभाग असल्याने प्रकरणाची वाच्यता होऊ नये किंवा संस्थेची प्रतिमा खराब होऊ नये, या भीतीने तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचीही चर्चा आहे.
महिला सुरक्षा समित्या, नियमित पोलिस गस्त, सीसीटीव्ही यंत्रणा, शाळा-कॉलेज प्रशासन आणि पालक यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. मुलींची सुरक्षितता ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना व्यक्त होत आहे. रस्त्यावरून जाणारी प्रत्येक मुलगी ही आपल्या घरातीलच मुलगी आहे, या भावनेतून समाजाने पुढे येत छेडछाड करणाऱ्यांना तत्काळ रोखण्याची गरज आहे.
शांतता म्हणजे संमती नाही
छेडछाडीच्या घटनांकडे दुर्लक्ष करणे किंवा 'हे नेहमीच घडते' अशी मानसिकता ठेवणे धोकादायक आहे. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई झाली, तरच अशा प्रवृत्तींना आळा बसू शकतो.
विद्यार्थिनी आणि शिक्षकांशी सातत्याने संवाद साधत आहोत. सासवड पोलिस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील महिलांचा व्हॉट्सॲप गट तयार करण्यात येत आहे. पोलिस गस्त वाढविण्यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती आणि आत्मविश्वास वाढविणारे संवादसत्रही आयोजित करण्यात येणार आहे.
संतोष घोळवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सासवड पोलिस ठाणे