Sugar  Pudhari
पुणे

Sugar Price: साखरेचे दर उतरणार?; सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी केंद्राचा १३ लाख टनांचा मुबलक कोटा

कारखानास्तरावरील निविदांचे दर मंदीकडे; घाऊक बाजारातही साखर स्वस्त होण्याची शक्यता, विक्रीनंतर ७ दिवसांत माल बाजारात आणण्याचे बंधन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारने साखरेची दरपातळी सामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी आणखी पावले उचलली असून, सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी १३ लाख टनांचा मुबलक कोटा जाहीर केला आहे. त्यामुळे कारखानास्तरावर साखरेच्या निविदांमधील दर सोमवारपासून (३१ ऑगस्ट) मंदीकडे झुकण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारातही दर खाली येण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात आली.

केंद्र सरकारने साखर बाजाराच्या इतिहासात प्रथमच रविवार असूनही सुट्टीच्या दिवशी साखरेचा कोटा खुला केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. यावरून केंद्र सरकार साखरेच्या दरपातळीवर करडी नजर ठेवून असल्याचे स्पष्ट होत आहे.

मागील आठवड्यात घाऊक बाजारातस एस ३० ग्रेड साखरेचे दर घटून क्विंटलला ५५०० रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. तर कारखान्यांवरील साखर निविदाही ४८०० ते ५००० रुपयांपर्यंत खाली आल्याचे चित्र आहे. सर्वजण सप्टेंबर महिन्यासाठी केंद्र सरकार किती कोटा जाहीर होणार, याकडे डोळे लावून बसले होते.

कारण बाजारात जादा दराने खरेदी केलेल्या साखरेची उपलब्धता आहे. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी आता कोटाच मुबलक दिल्यामुळे बाजाराची मनोवृत्ती मंदीकडे झुकली आहे. त्यामुळे सोमवारी याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

विक्रीनंतर ४० टक्‍के साखर हवी कारखान्याबाहेर

सप्टेंबर २०२६ पासून साखर विक्रीचे नियम पूर्णपणे बदलत आहेत. संपूर्ण महिन्याऐवजी आता पहिले १५ दिवस व नंतर १६ ते ३० तारीख असे १५ दिवस असा दोन टप्प्यात स्वतंत्र साखर कोटा घोषित होईल. पहिल्या पंधरवड्यात घोषित कोट्यातील ४० टक्‍के मालाची कारखान्यांना पहिल्या सात दिवसांत विक्री करावी लागेल. कारखान्यांनी ज्या दिवशी साखर विकली, त्या दिवसांपासून सात दिवसाच्या आत ती साखर कारखान्याच्या गेटबाहेर म्हणजे बाजारपेठेत व्रिकीस उपलब्ध असणे अपेक्षित आहे. त्याद्वारे मुबलक पुरवठा होऊन दरपातळी नियंत्रणात येण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT