पुणे: ऑगस्ट महिन्यात दिलेल्या कोट्यानुसार साखर विक्रीस सहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्यामुळे आणि ग्राहकांकडून खरेदी कमी होत आहे. त्यामुळे निविदांमध्ये साखरेचे दर क्विंटलला ५०० रुपयांनी गडगडले असून एस् ३० ग्रेडचा दर घटून ५४०० ते ५५०० रुपयांपर्यंत खाली आला.
केंद्र सरकारकडून साखर दरवाढीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांमध्ये सट्टेबाजांवर लक्ष केंद्रित झाले असून, कारखान्यांकडील विक्रीनुसार उपलब्ध साखर साठ्याचे सुरू असलेल्या माहिती संकलनामुळे संभाव्य कारवाईच्या शक्यतेने दबाव निर्माण झाल्यामुळे दरात घसरण सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने २२.५० लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला. मागणीच्या तुलनेत कोटा कमी राहून निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजांचा शिरकाव झाला. त्यामुळे एस् ३० ग्रेड साखरेचे दर घाऊक बाजारात क्विंटलला सात हजार रुपये या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. आता त्यामध्ये सातत्याने घट होत राहिलेली दिसून येत आहे. बाजारात मंगळवारी एस् ३० ग्रेड साखरेचे दर क्विंटलला ३०० ते ४०० रुपयांनी घटून ६००० ते ६२०० रुपये झाले आहेत. निविदांमध्ये दर घटल्यास हे दर आणखी खाली येण्याची शक्यता जाणकार व्यापाऱ्यांनी वर्तविली.
दरम्यान, कारखान्यांवरील साखरेच्या निविदा क्विंटलला सहा हजार रुपये दराने जात होत्या. ऑगस्ट महिन्यातील कारखानानिहाय दिलेल्या कोट्यानुसार साखर निविदांद्वारे विक्रीस कमी प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांकडून मागणी कमी असल्याने या निविदा ५४०० ते ५५०० रुपयांपर्यंत खाली आल्याचे सांगण्यात आले. काही कारखान्यांकडून तर ५२०० रुपये दराने खुल्या विक्रीद्वारे साखर विक्री ठेवली आहे.
त्यामुळे निविदांमध्ये दर आणखी खाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवाय, सप्टेंबर महिन्यासाठी सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन अधिक कोटा खुला केला जाण्याची चर्चा बाजारात आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून निविदांमध्ये साखरेचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपर्यंत याबाबतची नेमकी स्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.