

वडगाव शेरी: चंदननगर येथील हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ७ मध्ये (वर्ग २) दस्तनोंदणीच्या कामकाजावरून सलग दुसऱ्या दिवशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कार्यालयातील ढिसाळ कारभार, तसेच बोगस दस्तनोंदणी होत असल्याच्या आरोपावरून मंगळवारी वकिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. परिस्थिती चिघळल्याने कार्यालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे काही काळ दस्तनोंदणीचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
या कार्यालयात दस्तांचे नंबर, दस्तांमधील कागदपत्रे, चलन आदी विविध कारणांवरून वकील आणि सब-रजिस्ट्रार यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून धुसफूस सुरू होती. सोमवारी (दि. २४) देखील दस्तनोंदणीच्या कामावरून कार्यालयात गोंधळ झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी चंदननगर परिसरातील वकिलांनी कार्यालयात बोगस दस्तनोंदणी होत असल्याचा आरोप करत घोषणाबाजी केली. तसेच, काही काळ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने पोलिसांना बोलावले. त्यानंतर सह जिल्हा दुय्यम निबंधक अधिकारी आणि वकिलांमध्ये चर्चा झाली. चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांचा कारभार काढून घेण्यात आला. नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर कार्यालयाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.
ॲड. भैय्यासाहेब जाधव म्हणाले की, या कार्यालयात बोगस दस्त होत आहेत. इतर परिसरातील व्यक्ती येथे येऊन दस्तनोंदणी करीत असल्याने स्थानिक नागरिक आणि वकिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार तातडीने थांबविण्याची गरज आहे. त्यासाठीच सर्व वकिलांनी आंदोलन केले.
कामकाज विस्कळीत; नागरिकांची गैरसोय
वकिलांचे आंदोलन आणि प्रशासनाची भूमिका यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयाच्या नियमित कामकाजावर परिणाम झाला आहे. दस्तनोंदणीसाठी दूरवरून आलेल्या नागरिकांना या वादाचा थेट फटका बसला. कार्यालयीन कामकाज सुरळीत करून गैरसोय थांबवावी, तसेच बोगस दस्तनोंदणीच्या आरोपांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वरिष्ठांच्या सूचनेनुसारच कामकाज
हवेली दुय्यम निबंधक कार्यालयाचे सब-रजिस्ट्रार महादेव गुरव यांनी बोगस दस्तनोंदणीचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. ते म्हणाले, 'कोणतेही बोगस दस्त केले जात नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसारच कार्यालयाचे कामकाज केले जात आहे. केवळ हवेलीमधील दस्त आधी पाहावेत आणि इतर दस्तांचे काम करू नये, अशी वकिलांची मागणी आहे. तसेच पक्षकारांची सही, फोटो आणि चलन नसतानाही दस्त नंबर लावावेत, अशी मागणी करण्यात आली. मात्र, आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अशा स्पष्ट सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. त्यानुसारच काम केले जात आहे.'