पुणे: देशात यंदाच्या 2025-26 च्या ऊस गाळप हंगामात शेतकऱ्यांची उसाच्या एफआरपीची थकबाकी सुमारे एक लाख 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर अतिरिक्त साखर साठ्यामुळे सुमारे 28 हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल अडकून पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकरी जगविण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) प्रतिकिलोस 31 रुपयांवरून 41 रुपयांपर्यंत तातडीने सुधारणा करण्याची महत्त्वपूर्ण मागणी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे.
देशात उसाची वाढलेली एफआरपी आणि ऊसतोडणी वाहतूक खर्चात झालेल्या मोठ्या वाढीमुळे साखर उत्पादनाचा खर्च लक्षणीय वाढला आहे. साखर उत्पादनाचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च, कारखान्यातून विकल्या जाणाऱ्या साखरेच्या किमतीत होणारी घट याचा ताण साखर उद्योगावर पडत असल्याने हा उद्योग टिकविण्यासाठी तत्काळ सकारात्मक निर्णय घेण्याकडे साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी लक्ष वेधले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय ग््रााहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांनाही सविस्तर निवेदने दिलेली असल्याचे महासंघाकडून कळविण्यात आले आहे.
देशात साखर उत्पादनाची स्थिती उत्साहवर्धक असली तरी साखर कारखाने गंभीर आर्थिक तणावाखाली आहेत. हंगामाच्या सुरुवातीपासून अखिल भारतीय सरासरी एक्स-मिल साखरेच्या किमती प्रतिटन सुमारे 2300 रुपयांनी घसरल्या आहेत आणि सध्या त्या प्रतिटन सुमारे 37 हजार 700 रुपयांच्या आसपास आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या तरलतेवर आणि ऊस थकबाकीची रक्कम वेळेवर देण्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. साखर उद्योगातील महत्वाचा घटक असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हितरक्षण आणि साखर क्षेत्राला स्थैर्यासाठी निर्णय आवश्यक आहे.
अतिरिक्त पाच लाख टन साखर इथेनॉलकडे वळवावी!
साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्याबरोबरच इथेनॉल खरेदीच्या किंमती वाढविणे आणि अतिरिक्त पाच लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळविणे ही तातडीची गरज असल्याचे महासंघाने म्हटले आहे. केवळ या अतिरिक्त इथेनॉल उत्पादनातून जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे उत्पन्न साखर उद्योगास मिळू शकते. ज्यामुळे साखर कारखान्यांमधील रोख आर्थिक प्रवाह थेट मजबूत होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर उसाच्या एफआरपीची रक्कम देण्यास मदत होईल.
देशात साखरेचे 77 लाख 90 हजार मे. टन उत्पादन तयार
देशात यंदाचा साखर हंगाम 2025-26 ची सुरुवात उत्साहवर्धक, दिलासा देणारी आहे. 15 डिसेंबर 2025 पर्यंत देशभरातील 479 साखर कारखान्यांनी 77 लाख 90 हजार मेट्रिक टन साखरेचे उत्पादन तयार केले आहे. त्यामध्ये देशात झालेल्या साखर उत्पादनात प्रामुख्याने उत्तर प्रदेशात 25.05 लाख मे.टन, महाराष्ट्रात 31.30 लाख मे.टन तर कर्नाटकात 15.50 लाख मे. टनाइतके उत्पादन तयार झालेले आहे. यंदाचा साखर हंगाम 2025-26 साठी 15 लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत महासंघाने यापूर्वीच केले आहे.