पुणे : भाजप स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाल्यावर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आता कामाला लागली आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न सुरू असून, एक मोठा नेता यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र लढावे, असा प्रस्ताव शरद पवारांना दिला जाणार आहे.
हा मोठा नेता कोण आहे, हे सध्या सांगता येणे शक्य नाही, कारण त्यांचे नाव खूप गोपनीय ठेवण्यात आलेले आहे. मात्र, अतिशय वरिष्ठ स्तरावर राष्ट्रवादी एकत्र लढण्याची ही सगळी तयारी सुरू करण्यात आली आहे. या प्रयत्नांना गती मिळाली, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत लढू शकत नाहीत. त्या ठिकाणी त्यांना वेगळी 'मैत्रीपूर्ण लढत' लढावी लागेल.
या विधानानंतर पिंपरी चिंचवडमध्ये महत्त्वाची घडामोड झाली, जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नाना काटे आणि शरद पवारांच्या कोर कमिटीचे अजित गव्हाण यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये नाना काटेंनी माहिती दिली की सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना फोन करून 'मत विभाजन टाळून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा आणि लढा' असं म्हटलं होतं. त्यासाठी ही सगळी तयारी सुरू करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार किंवा सुनील तटकरे अशा सगळ्या नेत्यांच्या मार्फत हा संदेश दिला जाणार आहे. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासाठी तयारी करत आहेत आणि कार्यकर्तेसुद्धा त्यासाठी आग्रही असल्याचं दोन्ही राष्ट्रवादीकडून म्हटलं जात आहे. या संदर्भात आता एक-दोन दिवसांमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.