पुणे: राज्यातील गाळप हंगाम 2025-26 हा दिनांक 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीकरिता शेतकरी संघटनांकडून सतत मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत ऊस वजनकाट्यांची तपासणी करण्याची कार्यवाही करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहेत. (Latest Pune News)
भरारी पथकांमध्ये सर्व संबंधित घटकांचे प्रतिनिधी घेऊन अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करण्यात यावी तसेच गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मागील वर्षीच्या गाळप हंगामाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत साखर कारखान्यांच्या प्रमाणात तालुकानिहाय अथवा जिल्हा स्तरावर भरारी पथकाची स्थापना करावी. भरारी पथकांमध्ये महसूल, पोलिस, वैद्यमापन शास्त्र विभाग, प्रादेशिक साखर सहसंचालक व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी. कार्यरत साखर कारखान्यांच्या प्रमाणात तालुकानिहाय गरजेनुसार भरारी पथक स्थापन केल्यास तालुकास्तरीय संबंधित विभागाचे अधिकारी भरारी पथकातील सदस्य राहतील. जिल्हास्तरावरील भरारी पथक स्थापन केल्यास जिल्हास्तरावरील अधिकारी भरारी पथकात सदस्य राहतील.
भरारी पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक कार्यक्षेत्रातील साखर कारखाने व शेतकऱ्यांना उपलब्ध होतील अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात यावीत. जिल्ह्यातील भरारी पथकांनी स्वयंस्फूर्तीने कारखानास्थळावर अचानक भेटी देऊन वजनकाट्याची तपासणी करावी; जेणेकरून उसाच्या वजनासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींना आळा बसेल. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे, याची खात्री करावी. एखाद्या साखर कारखान्याबाबत उसाच्या वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेस किंवा पोलिसांकडे प्राप्त झाल्यावर लगेच त्या साखर कारखान्यांच्या वजनकाट्याची तपासणी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
वजनकाट्याच्या तपासणीमध्ये काही गैर कायदेशीर बाबी आढळल्यास सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वजनकाटा कॅलिब्रेशनमध्ये फेरफार करून ऊस वजन काटामारी केली जाते, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी ऊस वजनकाटा कॅलिब्रेशन करून सील करणे आवश्यक आहे. संबंधित वैद्यमापन अधिकाऱ्याने वजनकाट्याची तपासणी करतेवेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन ऊस वजनकाटे कॅलिब्रेशन झाल्यानंतर सील करावेत, अशाही सूचना साखर आयुक्त डॉ. कोलते यांनी दिल्या आहेत.
शासनाची वजनकाटे तपासणी यंत्रे धूळ खात पडलेली आहेत. त्यावरील धूळ प्रथम संबंधित विभागांनी झटकून ती वापरात आणावीत, नाहीतर विनावापर धूळ खात पडलेली सर्व यंत्रे हुडकून आम्हालाच भंगारात द्यावी लागतील. शासन कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सर्वत्र करू पाहत आहेत. त्यामुळे उसातील काटामारी रोखण्यासाठी एआय तंत्रज्ञान वापरून सर्व यंत्रणा ऑनलाइन करून पारदर्शकता आणण्याची आमची मागणी आहे.राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना