पुणे

आमची शाळा सुरू करा, चिमुकल्यांची आर्त हाक; अंगणवाड्या दीड महिन्यापासून बंद 

Laxman Dhenge
भोर : पुढारी वृत्तसेवा : सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी भोर तालुक्यातील 252 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी 40 दिवसांपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे दीड महिन्यापासून 4 हजार 500 चिमुकल्यांचा अंगणवाड्यांमधील किलबिलाट बंद आहे. दरम्यान,  आमची शाळा लवकर सुरू करा, अशी आर्त हाक महिनाभरापासून सुट्टीवर असलेले चिमुकले देत आहेत.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू असलेल्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस  बालचमुंचे आयुष्य घडविण्यास संजीवनी ठरत होत्या. शासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आंदोलनाची हत्यार उपसले आहे. त्याचा परिणाम होऊन तालुक्यातील अंगणवाड्या व कार्यक्षेत्रातील बालके, गरोदर माता यांच्या पोषण आहारावर परिणाम झाला आहे.
अंगणवाडी सेविका रोज 3 ते 6 वयोगटातील लाभार्थी बालकांना पोषण आहार शिजवून देत होत्या. मात्र, अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या संपामुळे लाभार्थींचा पोषण आहार थांबला आहे. बालकांचे रोजचे वजन- उंची होत नसल्यामुळे कुपोषणाची खरी माहिती शासनापर्यंत पोहोचत नाही. केलेल्या उपाययोजना लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत. अंगणवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणापासून चिमुकले मुकत असल्याने सरकारने अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांना लवकरात लवकर न्याय द्यावा तर आंगणवाड्या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT