

पिंपळनेर, जि.धुळे पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषद केंद्रशाळा डांगशिरवाडे येथील विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यासाठी मुख्याध्यापक श्रीकांत दिलीप अहिरे यांनी 'माझे आरोग्य माझी जबाबदारी' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले.
या व्याख्यानात डॉ.अर्चना घरटे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच लठ्ठपणा येणे, मधुमेह व डोळ्यांचे विकार यासारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप घेणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
तसेच, किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या काळात कोणत्या गोष्टी काळजी घ्याव्यात याबद्दलही डॉ.अर्चना यांनी माहिती दिली. या व्याख्यानानंतर आरोग्यसेवक जे.ए.सैय्यद यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार पेटीतील साहित्या विषयी माहिती दिली. या शिबिरात विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमास गावातील प्रथम नागरिक बेबीबाई सोनवणे सरपंच, शशिकांत नानाभाऊ सोनवणे उपसरपंच, वर्षा जगताप ग्रामसेवक, मगन बहिरम तलाठी, संदीप बागुल आरोग्य सेवक, कृषिकांत सोनवणे, भारती देसाई ग्राम पंचायत सदस्य, मीना देवरे, कमलेश नरवाडे, प्रमिला वळवी ग्रामपंचायत ऑपरेटर, ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोविंदा ग्यानदेव बागुल यांनी मानले.