पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेचे (स्पुक्टो) विद्यापीठातील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांकरिता बेमुदत धरणे आंदोलनाच्या आठव्या दिवशी संघटनेचे शिष्टमंडळ आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात चर्चा झाली. उभयतांमधील वाटाघाटी यशस्वी झाल्यानंतर संघटनेने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने संघटनेच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले होते. चर्चेमधे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्यासह स्पुक्टो अध्यक्ष डॉ. प्रकाश वाळुंज, सरचिटणीस डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शिष्टमंडळापुढे प्रास्ताविक करताना प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर व कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी संघटनेच्या दोन्ही मागण्या या कायदेशीर व न्याय्य असल्याची भूमिका ठेवली.
तसेच या मागण्यांसंदर्भात विद्यापीठ प्रशासन हे सकारात्मक असून, याबाबत व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित केली जाईल. याबाबत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्यावतीने लेखी शब्द दिला.
संघटनेच्या दोन्ही मागण्याबाबत असलेल्या प्रशासनिक त्रुटी व त्यातील अनियमितता दूर करण्यासाठी कमिटी नियुक्त केली जाईल व ही कमिटी आपला अहवाल ३ महिन्यांच्या आत कुलगुरू डॉ. गोसावी यांना देण्यास बांधील असेल. या कमिटीवर प्राध्यापक संघटनेचे प्रतिनिधी असतील. याबरोबरच विद्यापीठातील कुठल्याही प्राध्यापकास सेवेतून काढले जाणार नाही, अशीही ग्वाही कुलगुरू डॉ. गोसावी यांनी दिली. संघटनेच्या मागण्यांबाबत विद्यापीठ प्रशासन व संघटना यांच्यात मतैक्य पत्र तयार झाल्यामुळे संघटनेने पुढील आदेश येईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पुक्टोचे सरचिटणीस डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचे नमूद केले. याबरोबरच या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या व पाठिंबा दिलेल्या व्यक्ती व संघटना यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले. विद्यापीठ प्रशासन दिलेल्या शब्दांना जागत नसेल व दिरंगाई करत असेल, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉ. वाळुंज यांनी दिला आहे.