Someshwar Sugar Factory Pudhari
पुणे

Someshwar Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीला धक्कादायक वळण; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, विद्यमान अध्यक्ष भाजपच्या गळाला

someshwar sugar factory election 2026: सुनेत्रा पवार यांच्यासोबतची चर्चा फिसकटल्याची माहिती; माघारीच्या अंतिम दिवशी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

someshwar sugar factory election 2026

सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला ऐन निर्णायक टप्प्यावर धक्कादायक वळण मिळाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्यामध्ये मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेली चर्चा फिसकटल्याने जगताप यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा आज अकरा वाजता बोलावला आहे पुरंदरचे भाजपचे माजी आमदार संजय जगताप या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

मागील काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या राजकीय हालचालींना वेग आला असून, अद्याप कोणत्याही प्रमुख राजकीय गटाकडून पॅनलची अंतिम घोषणा झालेली नाही. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. जगताप यांच्या भूमिकेकडे तसेच पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पुरुषोत्तम जगताप यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा बुधवारी सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. या मेळाव्यात कोणती भूमिका जाहीर केली जाते, यावर निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या राजकीय उलथापालथीला काकडे-जगताप वादाची किनारही आहे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आज माघारीचा शेवटचा दिवस

सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस आहे. त्यामुळे आज दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भाजप, दोन्ही राष्ट्रवादी तसेच दोन्ही शिवसेना गटांकडून अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याने त्यानंतरच निवडणुकीचे प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होणार आहे.

आधीच मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असल्याने विविध गटांच्या पॅनलची रचना, कोणाला संधी मिळते आणि कोण माघार घेतो, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. ऐनवेळी कोणता गट कोणती भूमिका घेतो आणि निवडणुकीचे राजकीय समीकरण कोणत्या दिशेने वळते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुणे जिल्ह्याचे लक्ष सोमेश्वरकडे

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ कारखाना कार्यक्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आज उमेदवारी माघारीनंतर अंतिम यादी आणि पॅनल स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीतील खरी रंगत समोर येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचे लक्ष सध्या सोमेश्वर कारखाना निवडणुकीकडे लागले आहे.

जगतापांच्या मेळाव्याकडे लक्ष; वेगळी भूमिका घेण्याची शक्यता

भाजप नेते माजी आमदार संजय जगताप उपस्थित राहणार असल्याची चर्चा; सोमेश्वरच्या राजकारणात नवे समीकरण? सोमेश्वरच्या निवडणुकीत बुधवारी सकाळी होणारा विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप समर्थकांचा मेळावा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात जगताप वेगळी राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सभासदांसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपचे नेते तथा माजी आमदार संजय जगताप हेही या मेळाव्यास उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य उपस्थितीने सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाल्याची माहिती असून, त्यातून अंतिम तोडगा निघाला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बुधवारी सकाळच्या मेळाव्यात जगताप कोणती भूमिका मांडतात, याकडे सहकाराचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT