Someshwar Sugar Factory Pudhari
पुणे

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: निंबूत-खंडाळा गटात अजितदादा पवार पॅनलचा विजय

प्रमोद काकडे, अभिजित काकडे आणि डॉ. वसंतराव दगडे विजयी; कार्यकर्त्यांनी जल्लोषात विजय केला समर्पित

पुढारी वृत्तसेवा

सोमेश्वरनगर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत गट क्रमांक एक निंबूत-खंडाळा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने दणदणीत विजय मिळविला. या गटातून माजी सभापती प्रमोद काकडे, अभिजित काकडे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार डॉ. वसंतराव दगडे यांनी विजय संपादन केला. या विजयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विजयी उमेदवारांनी हा विजय दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित केला.

निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच निंबूत-खंडाळा गटात चुरशीचे वातावरण होते. राष्ट्रवादीच्या पॅनलसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जुन्या जाणत्या नेत्यांनीही गावोगावी जाऊन सभासदांच्या भेटीगाठी घेतल्या. या एकत्रित प्रयत्नांचा फायदा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना झाल्याचे चित्र आहे.

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी हातात अजितदादा पवार यांचे छायाचित्र घेऊन घोषणाबाजी केली. फटाक्यांची आतषबाजी, एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करणे आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन अशा उत्साही वातावरणात विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.

प्रमोद काकडे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत सभापती म्हणून काम पाहिले आहे. अभिजित काकडे यांची सोमेश्वर कारखान्याच्या संचालकपदाची ही दुसरी टर्म आहे. तर डॉ. वसंतराव दगडे यांनी यापूर्वी कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या तिन्ही उमेदवारांच्या अनुभवाचा आणि स्थानिक संपर्काचा निवडणुकीत फायदा झाल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, कारखान्याच्या इतर गटांमध्येही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान दिसून आले. निंबूत-खंडाळा गटातील विजयामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून, अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करत कार्यकर्त्यांनी हा विजय त्यांना समर्पित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT