बारामती: श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी जोरदार धक्का दिला आहे. अजितदादा यांचे पुत्र जय पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अजितदादा यांचे नाव व छायाचित्र वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी हे आदेश काढले.
जगताप यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल निवडणूक लढवत आहे. अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांच्या मान्यतेशिवाय कोणीही अजितदादा यांचे छायाचित्र अथवा नाव वापरू नये, असे पत्रक राष्ट्रवादीने प्रसिद्धीला दिले होते. त्यानंतरही जगताप यांनी पॅनेलच्या नावात बदल केला नाही. शिवाय प्रचार साहित्यावरही अजितदादांचे छायाचित्र ठेवले. त्यानंतर जय पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे धाव घेत हरकत अर्ज दाखल केला.
त्यानुसार अजितदादा पवार अथवा अजित पवार या नावाचा, त्यांच्या प्रतिमेचा वापर असलेले फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर्स, पत्रके तसेच अन्य मुद्रीत, इलेक्ट्राॅनिक किंवा डिजिटल प्रचार साहित्याचा तात्काळ वापर थांबवत हे साहित्य काढून घेण्याचे आदेश आहेर यांनी दिले आहेत.
ही कार्यवाही पूर्ण करत त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावा लागणार आहे. हे साहित्य काढून न घेतल्यास किंवा नावाचा वापर न थांबविल्यास फौजदारी कारवाईचा इशारा निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दिला आहे.