पुणे : सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सराफी पेढीवर दरोडा टाकून फरार झालेल्या सराइताला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. अजिंक्य विश्वजित चव्हाण असे सराइताचे नाव आहे. चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध वारजे, विजापूर नाका आणि वळसंग पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
याबाबत बोलताना वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांनी सांगितले, आरोपी चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा टाकला होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. दरम्यान, यातील काही आरोपींना सोलापूर पोलिसांनी अटक केली होती. मात्र चव्हाण हा फरार झाला होता. वारजे माळवाडी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना, पोलिस कर्मचारी अमोल सूतकर यांना चव्हाण हा प्रयेजा सिटी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार 25 डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सापळा रचून चव्हाण याला पाठलाग करून पकडले. चव्हाण हा वारजे परिसरातील एका गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य आहे. त्यांच्या टोळीतील एकाचा 2023 मध्ये खून झाला होता. त्याचा बदला घेण्याच्या तयारीत तो असल्याची गोपनिय माहिती वारजे पोलिसांना मिळाली होती. चव्हाण गेल्या दोन महिन्यापासून वारजे परिसरातून फरार होता, असेदेखील काईंगडे यांनी सांगितले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे, गुन्हे निरीक्षक प्रकाश धेंडे, नीलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे, कर्मचारी निखिल तांगडे, अमित शेलार, योगेश वाघ, सागर कुंभार, महादेव शिंदे, शरद पोळ यांच्या पथकाने केली.